येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होते. तिथे ते जेवायला बसले असताना, एक स्त्री अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ते बसले असताना येशूंच्या मस्तकावर तेल ओतले.
जेव्हा शिष्यांनी हे पाहिले त्यावेळी ते संतापले. ते म्हणाले, “ही नासाडी कशाला? हे तेल अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.”
हे जाणून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही या स्त्रीला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही. माझ्या अंत्यविधीची तयारी म्हणून तिने हे तेल माझ्या शरीरावर ओतले आहे. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जिथे कुठे ही शुभवार्ता गाजविण्यात येईल, तिथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.”
यानंतर बारा शिष्यांपैकी एक जो यहूदाह इस्कर्योत; महायाजकांकडे गेला. आणि त्याने त्यांना विचारले, “येशूंना मी तुमच्या स्वाधीन केले, तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी मोजून दिली. त्या वेळेपासून यहूदाह येशूंना धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला.
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, “वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी?”
येशूंनी उत्तर दिले, “शहरात जा आणि या एका माणसाची भेट घ्या. त्याला सांगा की, ‘गुरुजी म्हणतात: माझी नेमलेली वेळ जवळ आली आहे. मी माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन तुझ्या घरी करेन.’ ” येशूंनी सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी केले आणि वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर मेजावर टेकून बसले होते. आणि ते भोजन करीत असताना येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की तुमच्यापैकी एकजण माझा विश्वासघात करेल.”
येशूंचे हे उद्गार ऐकताच शिष्यांची अंतःकरणे दुःखी झाली आणि ते त्यांना विचारू लागले, “प्रभूजी, खरोखर तो मी तर नाही ना?”
येशूंनी उत्तर दिले, “ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला आहे तोच माझा विश्वासघात करणार आहे. कारण त्यांच्याबद्दल लिहिल्याप्रमाणे मानवपुत्र जातो खरा. परंतु जो मानवपुत्राला विश्वासघाताने धरून देतो, त्याचा धिक्कार असो. तो जन्मलाच नसता, तर ते त्याला अधिक हिताचे झाले असते.”
मग जो त्यांना धरून देणारा होता, त्या यहूदाहने येशूंना विचारले, “खरोखर रब्बी, तो मी तर नाही ना?”
त्यावर येशूने उत्तर दिले, “तू स्वतःच तसे म्हटले आहेस.”
भोजन करीत असताना, येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद मागितल्यावर ती मोडली आणि आपल्या शिष्यांना दिली. मग ते म्हणाले, “घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे.”
त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला व म्हणाले, “तुम्ही प्रत्येकजण यामधून प्या; हे माझ्या कराराचे रक्त आहे. बहुतांना पापक्षमा मिळावी म्हणून ते पुष्कळांसाठी ओतले जात आहे. मी तुम्हाला सांगतो की, येथून पुढे मी पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षारस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलीचा उपज मी पिणार नाही.”
मग त्या सर्वांनी मिळून एक गीत गाईले आणि ते जैतुनाच्या डोंगराकडे गेले.