त्यावेळी येशू जमावाला म्हणाले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय, जे तुम्ही तरवार आणि लाठ्या घेऊन मला धरावयास आला आहात? मी दररोज मंदिराच्या परिसरात बसून शिक्षण देत होतो, पण त्यावेळी तुम्ही मला धरले नाही. यासाठी की संदेष्ट्यांनी धर्मशास्त्रात लिहिलेली भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठीच हे सर्व घडत आहे.” मग सर्व शिष्य त्यांना एकट्याला सोडून पळून गेले.
येशूंना अटक करून त्यांना प्रमुख याजक कयफा याच्याकडे नेले; त्याठिकाणी सर्व वडीलजन आणि नियमशास्त्र शिक्षक एकत्र झाले होते. पेत्र काही अंतरावरुन त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला आणि पहारेकर्यांमध्ये जाऊन काय होते ते पाहत बसला.
मुख्य याजक, आणि सर्व यहूदी न्यायसभा येशूंना जिवे मारण्यासाठी खोटे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु ते त्यांना सापडले नाही जरी अनेक खोटे साक्षीदार पुढे आले.
शेवटी दोन माणसे पुढे आली, “हा मनुष्य म्हणाला, ‘मी परमेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यास व तीन दिवसात ते पुन्हा बांधण्यास समर्थ आहे.’ ”
हे ऐकून प्रमुख याजक उभा राहिला आणि त्याने येशूंना विचारले, “या आरोपांना तू उत्तर देणार नाही काय? हे लोक जी साक्ष तुझ्याविरुद्ध सांगत आहे ती काय आहे?” पण येशू शांत राहिले.
नंतर महायाजकाने त्यांना विचारले, “जिवंत परमेश्वराच्या नावाने शपथ घालून मी तुला विचारतो की, तू पुत्र परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त आहेस का?”
येशूंनी उत्तर दिले, “असे तू म्हणतोस, परंतु मी तुम्हा सर्वांना सांगतो की येथून पुढे तुम्ही मला, अर्थात् मानवपुत्राला, सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशातून मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहाल.”
येशूंचे हे उद्गार ऐकल्याबरोबर महायाजकाने आपली वस्त्रे फाडली आणि तो ओरडला, “तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे. आता आणखी साक्षीदारांची आपल्याला गरजच काय? पाहा, तुम्ही ईश्वरनिंदा ऐकली आहे. तुम्हाला काय वाटते?”
“तो मृत्युदंडास योग्य आहे.” त्यांनी ओरडून प्रत्युत्तर दिले.
मग ते येशूंच्या तोंडावर थुंकले आणि त्यांना बुक्क्या मारल्या. काहींनी त्यांच्या तोंडात चपडाका मारल्या, आणि म्हटले, “ख्रिस्ता, आम्हासाठी भविष्यवाणी करा. तुम्हाला कोणी मारले?”
हे सर्व होत असताना, पेत्र अंगणात बाहेर बसला होता आणि एक दासी त्याच्याकडे आली व ती त्याला म्हणाली, “तू गालीलकर येशूंबरोबर होतास.”
परंतु पेत्राने सर्वांच्यासमोर नकार दिला. तो म्हणाला, “तू कशाबद्दल बोलतेस हे मला समजत नाही.”
मग तो बाहेरील आवाराच्या दाराजवळ गेला, तेथे त्याला दुसर्या एका दासीने पाहिले आणि ती लोकांना म्हणाली, “हा माणूस नासरेथच्या येशूंबरोबर होता.”
या खेपेसही पेत्र नाकारून आणि शपथ घेऊन म्हणाला, “मला त्या माणसाची ओळख नाही!”
थोड्या वेळाने जी माणसे तेथे उभी होती. ती पेत्राला म्हणाली, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस हे आम्हाला माहीत आहे. तुझ्या बोलण्यावरून आम्ही हे सांगू शकतो.”
हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “मी त्या माणसाला ओळखत नाही.”
तेवढ्यात कोंबडा आरवला. तेव्हा त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील.” पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला.