YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 24:26-35

मत्तय 24:26-35 MRCV

“जर कोणी तुम्हाला सांगेल, ‘तो तिथे रानात आहे,’ तर तिकडे जाऊ नका किंवा तो तिथे ‘आतील खोलीत आहे,’ तर विश्वास ठेवू नका. कारण जशी वीज पूर्वेकडून निघते आणि पश्चिमेकडे प्रकाशतांना दिसते, तसाच प्रकारे मानवपुत्राचे आगमन होईल. जिथे मृतदेह आहे, तिथे गिधाडे जमतील. “क्लेशांच्या काळाची समाप्ती झाल्यावर “ ‘त्या दिवसात, सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही; आकाशातून तारे गळून पडतील, आणि आकाशमंडळ डळमळेल.’ “मानवपुत्राच्या आगमनाचे चिन्ह आकाशात दिसेल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे मोठा आक्रोश करतील. ते मानवपुत्राला आकाशात मेघारूढ होऊन पराक्रमाने परत येत असलेले पाहतील. तो कर्ण्यांच्या महानादाबरोबर आकाशांच्या या टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत आणि चारही दिशेकडून त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी आपल्या दूतांस पाठवेल. “आता अंजिराच्या झाडापासून हा बोध घ्या व शिका. त्या झाडाच्या डाहळ्या कोवळ्या झाल्या आणि त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे, हे तुम्ही ओळखता. या सर्व घटना घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा ते अगदी जवळ, दारातच आहे हे समजून घ्या. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.