YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 24:1-22

मत्तय 24:1-22 MRCV

येशू मंदिरातून बाहेर पडून चालत असता, त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांचे लक्ष मंदिराच्या इमारतींकडे वेधले. येशू त्यांना म्हणाले, “हे सर्व तुम्ही आता पाहत आहात ना? मी तुम्हाला खचित सांगतो की, एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही. प्रत्येक दगड खाली पडेल.” येशू मंदिराच्या समोर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर बसले असताना, शिष्य त्यांच्याकडे एकांतात आले आणि विचारले, “ही घटना केव्हा घडेल आणि आपले पुनरागमन आणि युगाचा शेवट घडण्या अगोदर कोणती चिन्हे असतील?” येशूंनी त्यांना म्हटले, “कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून सावध राहा. कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि, ‘मी ख्रिस्त आहे,’ असे जाहीर करतील आणि पुष्कळांना फसवतील. तुम्ही लढायासंबंधी ऐकाल आणि लढायांच्या अफवा ऐकाल, पण त्यामुळे तुम्ही घाबरू नका. कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत, पण शेवट अजूनही यावयाचा आहे. कारण राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. वेगवेगळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळही पडतील. या घटना तर प्रसूती वेदनांची सुरुवात आहेत. “छळ करण्यासाठी आणि जिवे मारण्यासाठी तुम्हाला धरून दिले जाईल आणि माझ्यामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्यावेळी पुष्कळ जण विश्वासापासून दूर जातील व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेष्टे उदयास येतील आणि पुष्कळांना फसवतील. दुष्टता वाढेल व त्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील त्याचे तारण होईल. सर्व जगामध्ये साक्ष म्हणून राज्याच्या शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झाला पाहिजे आणि मगच शेवट होईल. “संदेष्टा दानीएल याने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ पवित्रस्थानी उभा असलेला तुम्ही पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे— त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता खाली उतरू नये. जो शेतात असेल, त्याने आपला अंगरखा नेण्यासाठी परत जाऊ नये. गर्भवती आणि दूध पाजणार्‍या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशांचा असेल! तुमच्या पलायनाचा काळ हिवाळ्यात किंवा शब्बाथ दिवशी येऊ नये, म्हणून प्रार्थना करा. कारण ते दिवस इतके भयानक असतील की, परमेश्वराने पृथ्वी निर्माण केल्यापासून आजपर्यंत असे दिवस आले नाहीत किंवा पुढेही येणार नाहीत. “आणि परमेश्वराने हा आपत्तिचा काळ कमी केला नाही, तर पृथ्वीवर कोणीही जिवंत राहणार नाही. तरी निवडलेल्या लोकांसाठी मात्र ते दिवस कमी केले जातील.

मत्तय 24 वाचा