मग येशू लोकसमुदायाला आणि आपल्या शिष्यांना म्हणाले: “नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी मोशेच्या सिंहासनावर बसतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे करा, पण ते जे करतात ते आचरण करू नका, कारण ते सांगतात त्याप्रमाणे ते करीत नाहीत. ते जड, अवघड ओझी बांधतात व इतर लोकांच्या खांद्यावर लादतात, परंतु ती हालविण्यास स्वतःचे बोटही लावण्याची त्यांची इच्छा नसते.
“जे काही ते करतात ते सर्व लोकांना दाखविण्यासाठी असते: ते वचने लिहिलेल्या चामड्याच्या पट्ट्या लोकांना दिसाव्या म्हणून रुंद करतात, आणि आपल्या झग्यांचे गोंडे लांब करतात. मेजवान्यात मानाची स्थाने आणि सभागृहांमध्ये प्रमुख जागेवर बसणे, हे त्यांना प्रिय आहे. बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे आणि ‘रब्बी’ संबोधने त्यांना कितीतरी प्रिय आहेत.
“परंतु तुम्ही स्वतः ‘रब्बी,’ म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एकच आहे आणि तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात. आणि या पृथ्वीवर कोणालाही ‘पिता’ म्हणून संबोधू नका, कारण तुम्हाला एकच पिता आहे व ते स्वर्गात आहे. ‘शिक्षण देणारा’ असे स्वतःला म्हणवून घेऊ नका, कारण एकटे ख्रिस्त हेच एक तुमचे ‘मार्गदर्शक’ आहे. जो तुम्हामध्ये सर्वात मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे. कारण जे स्वतःला उच्च करतात, त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, ते उंच केले जातील.
“अहो परूश्यांनो, आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, ढोंग्यांनो तुम्हाला धिक्कार असो. कारण तुम्ही लोकांच्या तोंडावर स्वर्गाचे द्वार बंद करिता, आणि स्वतःही प्रवेश करीत नाही, ना जे प्रवेश करू इच्छितात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत. ते देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात. अशा लोकांना कडक शिक्षा होईल.
“अहो नियमशास्त्र शिक्षकांनो आणि परूश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुम्हाला धिक्कार असो. एका माणसाचे परिवर्तन करण्याकरिता तुम्ही भूमार्गाने आणि जलमार्गाने प्रवास करता आणि जेव्हा त्याचे परिवर्तन होते, तेव्हा तुम्ही त्याला आपल्यापेक्षा दुप्पट प्रमाणात नरकपुत्र करून ठेवता.
“आंधळ्या मार्गदर्शकांनो, तुमचा धिक्कार असो! ‘परमेश्वराच्या मंदिराची शपथ घेऊन तुम्ही म्हणता, मंदिराची शपथ मोडली तरी चालेल पण मंदिरातील सोन्याची घेतलेली शपथ कधीही मोडता कामा नये.’ अहो आंधळ्या मूर्खांनो! ते सोने श्रेष्ठ आहे की त्या सोन्याला पवित्र करणारे ते मंदिर श्रेष्ठ आहे? तुम्ही असेही म्हणता, ‘मंदिरातील वेदीची शपथ घेतली आणि ती मोडली तरी चालेल,’ पण वेदीवरील दानाची शपथ घेतली तर तो त्यास बंधनकारक आहे. अहो आंधळ्यांनो, ती देणगी श्रेष्ठ आहे की त्या देणगीला पवित्र करणारी वेदी श्रेष्ठ आहे? लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही वेदीची शपथ वाहता त्यावेळी वेदीबरोबर वेदीवरील सर्व वस्तुंचीही शपथ वाहता, आणि ज्यावेळी तुम्ही मंदिराची शपथ वाहता त्यावेळी मंदिराबरोबरच मंदिरात राहणार्या परमेश्वराचीही शपथ वाहता. ज्यावेळी तुम्ही स्वर्गाची शपथ वाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराच्या सिंहासनाची आणि खुद्द परमेश्वराची शपथ वाहता.