YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 21:28-46

मत्तय 21:28-46 MRCV

“तुम्हाला काय वाटते? एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मोठ्या मुलाला म्हणाला, ‘मुला, आज द्राक्षमळ्यामध्ये जा व काम कर.’ ” मुलगा म्हणाला, “ ‘मी द्राक्षमळ्यात जाणार नाही,’ पण नंतर त्याने आपले मन बदलले आणि तो गेला. “मग पिता धाकट्या मुलालाही तसेच म्हणाला. मुलगा म्हणाला, ‘मी जातो, बाबा.’ पण तो गेलाच नाही.” मी विचारतो, “पित्यास जे पाहिजे होते ते या दोन मुलांपैकी कोणत्या मुलाने केले?” “वडील मुलाने,” त्या लोकांनी उत्तर दिले. मग येशू आपल्या दाखल्याचा खुलासा करीत म्हणाले, “मी खरे सांगतो, जकातदार लोक आणि वेश्या तुमच्या आधी परमेश्वराच्या राज्यात जात आहेत. कारण योहान नीतिमत्वाचा मार्ग दाखवित तुम्हाकडे आला, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; उलट जकातदार लोक आणि वेश्यांनी तसे केले. हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले असतानाही, तुम्ही पश्चात्ताप करण्याचे आणि विश्वास ठेवण्याचे नाकारले. “दुसरा एक दाखला ऐका: एका जमीनदाराने एक द्राक्षमळा लावला. त्याच्याभोवती भिंत बांधली व त्यात द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि संरक्षणासाठी एक बुरूजही बांधला. मग द्राक्षमळा काही शेतकर्‍यांना भाड्याने देऊन दुसर्‍या ठिकाणी राहवयास गेला. हंगामाचे दिवस आल्यावर फळातून काही मिळावे म्हणून त्याने नोकरांना शेतकर्‍यांकडे पाठविले. “परंतु शेतकर्‍यांनी सेवकांना धरले; एकाला मारले, दुसर्‍याला ठार केले आणि तिसर्‍याला दगडमार केला. मग जमीनदाराने त्यांच्याकडे पहिल्या वेळेपेक्षा जास्त नोकर पाठविले. पण त्यांनाही त्यांनी तसेच केले. सर्वात शेवटी, त्याने आपल्या पुत्राला त्यांच्याकडे पाठविले व म्हणाला, ‘ते माझ्या पुत्राचा तरी मान राखतील.’ “पण शेतकर्‍यांनी जमीनदारांच्या पुत्राला येताना पाहिले, तेव्हा ते आपसात म्हणाले, ‘हा तर वारस आहे. चला, आपण त्याला ठार मारू या आणि त्याचे वतन घेऊ या.’ त्याप्रमाणे त्यांनी त्याला धरले आणि त्याचा वध करून त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले आणि त्याचा जीव घेतला. “आता, जेव्हा द्राक्षमळ्याचा धनी येईल, त्यावेळी तेव्हा तो त्या भाडेकर्‍यांचे काय करेल असे तुम्हाला वाटते?” त्यांनी उत्तर दिले, “तो या दुष्ट लोकांना ठार करेल आणि जे त्याला हंगामाच्या वेळी फळ देतील, अशा दुसर्‍या शेतकर्‍यांना तो द्राक्षमळा भाड्याने देईल.” येशूंनी त्यांना म्हटले, “धर्मशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय: “ ‘जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला आहे; प्रभूने हे केले आहे, आणि आमच्या दृष्टीने ते अद्भुत आहे.’ “यास्तव परमेश्वराचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल आणि जे लोक फळ देतील त्यांना दिले जाईल. या खडकावर जे आदळतील त्यांचे तुकडे होतील, परंतु ज्यांच्यावर हा खडक आदळेल त्यांचा चुराडा होईल.” आपल्याविषयीच या गोष्टीमधून येशू बोलत आहेत हे महायाजक आणि परूशी यांच्या ध्यानात आले, तेव्हा येशूंना अटक करण्याचा ते काहीतरी मार्ग शोधू लागले. पण त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण सर्व लोक येशूंना संदेष्टा मानीत होते.