ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले, त्यांना म्हणाले, “समोरच्या गावात जा, तिथे पोहोचताच, तुम्हाला एक गाढवी दिसेल, तिच्याजवळ शिंगरू बांधून ठेवलेले असेल; त्यांना सोडून माझ्याकडे आणा. कोणी तुम्हाला विचारले, तर त्यांना एवढेच सांगा, प्रभूला त्याची गरज आहे आणि ते लागलीच पाठवून देतील.”
संदेष्ट्याने केलेले भविष्यकथन पूर्ण व्हावे म्हणून असे झाले:
“सीयोनकन्येला सांगा की,
पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे.
तो लीन आहे व गाढवीवर बसून येत आहे,
आणि गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे.”
शिष्य गेले आणि येशूंनी त्यांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी केले. त्यांनी गाढवी व शिंगरू आणली आणि त्यांचे वस्त्रे गाढवी व शिंगरूच्या पाठीवर टाकले मग येशू त्यावर बसले. गर्दीतील काही लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले; तर इतर काहींनी झाडांच्या डाहळ्या तोडून रस्त्यावर पसरल्या. मग जमावातील जे लोक त्यांच्यापुढे गेलेले आणि जे त्यांच्यामागून चालले, ते मोठ्याने ओरडून म्हणाले,
“दावीदाच्या पुत्राला होसान्ना!”
“प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.”
“सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!”
येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा सर्व शहर जागे झाले आणि त्यांनी विचारले, “हा कोण आहे?”
“हे येशू आहेत!” गर्दीतील लोकांनी उत्तर दिले, “गालीलाच्या नासरेथहून आलेले संदेष्टा आहेत.”
येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि तिथे खरेदीविक्री करणार्या सर्वांना त्यांनी बाहेर घालवून दिले. पैशाची अदलाबदल करणार्यांचे मेज आणि कबुतरे विकणार्यांची आसने त्यांनी उधळून लावली. ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, माझ्या घराला प्रार्थनेचे घर म्हणतील पण तुम्ही याला लुटारूंची गुहा केली आहे.”
मग मंदिरात त्यांच्याकडे आंधळे व अपंग लोक आले आणि त्यांनी त्यांना बरे केले. तरी जेव्हा मुख्य याजक आणि नियमशास्त्र शिक्षकांनी ही अद्भुत कामे पाहिली आणि लहान मुलांना मंदिराच्या परिसरात, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” असे ओरडतांना ऐकले, तेव्हा ते संतापले.
त्यांनी येशूंना विचारले, “ही मुले काय म्हणत आहेत, हे तुम्ही ऐकत आहात ना?”
येशूंनी उत्तर दिले, “हो, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?
“ ‘लेकरे आणि तान्ही बालके यांच्याद्वारे
हे प्रभू तू आपली स्तुती प्रकट केली आहे,’ ”
मग ते बेथानीस परत आले आणि रात्रीचा मुक्काम त्यांनी तिथेच केला.
अगदी पहाटेच ते पुन्हा शहराकडे निघाले. रस्त्यात असताना येशूंना भूक लागली. जवळच त्यांना अंजिराचे झाड दिसले. त्यावर काही अंजीर आहेत काय हे पाहण्यास ते झाडाजवळ गेले. त्या झाडावर त्यांना पानांशिवाय काही आढळले नाही. मग ते त्या झाडाला म्हणाले, “यापुढे तुला फलप्राप्ती होणार नाही.” आणि तत्काळ ते झाड वाळून गेले.
हे पाहून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूंना विचारले, “ते अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले?”
मग येशूंनी त्यांना म्हटले, “मी तुम्हाला सत्य सांगतो की, तुम्ही संशय न धरता विश्वास ठेवाल, तर जे काही अंजिराच्या झाडाबाबत झाले ते तुम्ही सुद्धा कराल, या डोंगराला ‘ऊठ आणि समुद्रात पड,’ असे तुम्ही म्हणालात, तर ही गोष्ट केली जाईल. तुम्ही विश्वास ठेऊन आणि प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल.”
येशूंनी मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि ते शिकवीत असता मुख्य याजक व यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले व त्यांना जाब त्यांना विचारू लागले, “कोणत्या अधिकाराने या गोष्टी तुम्ही करत आहात? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?”
येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. त्याचे उत्तर द्या मग मी कोणत्या अधिकाराने करीत आहे, हे तुम्हाला सांगेन. योहानाला बाप्तिस्मा करण्याचा अधिकार कुठून प्राप्त झाला होता, स्वर्गापासून किंवा मनुष्याकडून?”
या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली, “योहानाचा बाप्तिस्मा, ‘स्वर्गापासून होता,’ असे आपण म्हणालो, तर ते विचारतील, ‘त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही’? जर आपण म्हणालो, ‘मनुष्यांपासून होता’ तर आम्हाला लोकांची भीती आहे. कारण योहान संदेष्टा होता, असा सर्वांचाच ठाम विश्वास होता.”
शेवटी त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला माहीत नाही.”
यावर येशू म्हणाले, “तर मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हाला सांगणार नाही.