YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 13:33-58

मत्तय 13:33-58 MRCV

त्यांनी त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य त्या खमिरासारखे आहे, जे एका स्त्रीने ते घेतले आणि तीन माप पिठात एकत्र केले की त्यामुळे सर्व पीठ फुगले.” या सर्वगोष्टी येशू गर्दीतील लोकांशी दाखल्यांद्वारे बोलले; आणि ते दाखल्यांवाचून त्यांच्याशी काहीच बोलले नाही. याप्रमाणे संदेष्ट्यांद्वारे जे भविष्य सांगितले होते ते पूर्ण झाले ते हे: “मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन. जगाच्या उत्पत्तीपासून ठेवलेले रहस्य मी त्यांना सांगेन.” गर्दीला बाहेर सोडून ते घरात गेले, तेव्हा त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “शेतातील रानगवताच्या दाखल्याचा अर्थ आम्हाला स्पष्ट करून सांगा.” ते म्हणाले, “उत्तम प्रतीचे बी पेरणारा मानवपुत्र आहे. जग हे शेत आहे आणि चांगले बी हे परमेश्वराच्या राज्याचे लोक आहेत. रानगवत सैतानाच्या लोकांचे प्रतीक आहे. गव्हामध्ये रानगवताचे बी पेरणारा शत्रू म्हणजे सैतान आहे. हंगाम म्हणजे युगाचा अंत आणि कापणी करणारे म्हणजे देवदूत आहेत. “जसे रानगवत उपटून अग्नीत जाळण्यात आले, त्याचप्रमाणे युगाच्या शेवटी होईल. मानवपुत्र त्यांचे देवदूत पाठवेल आणि पाप व दुष्टाई करणार्‍या सर्वांना त्यांच्या राज्यातून बाहेर काढेल. त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जिथे रडणे आणि दातखाणे चालेल. मग नीतिमान लोक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील. ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे. “स्वर्गाचे राज्य शेतात दडवून ठेवलेल्या धनासारखे आहे. एका मनुष्याला ते सापडले, तेव्हा त्याने ते पुन्हा लपविले आणि अतिशय आनंदाने त्याच्याजवळ होते ते सारे विकून ते शेत विकत घेतले. “पुन्हा, स्वर्गाचे राज्य उत्तम प्रतीच्या मोत्यांच्या शोधात असलेल्या एका व्यापार्‍यासारखे आहे. त्याला फार मोठ्या किमतीचे एक मोती सापडले तेव्हा त्याने जाऊन आपल्या मालकीचे सर्वकाही विकून ते विकत घेतले. “आणखी, स्वर्गाचे राज्य मासे धरण्यार्‍या एका जाळ्यासारखे आहे. ते सरोवरात टाकले आणि जाळ्यात सर्वप्रकारचे मासे लागले. जाळे भरल्यावर कोळी लोकांनी ते ओढून काठावर आणले. मग खाली बसून त्यांनी चांगले मासे भांड्यात भरले आणि वाईट मासे फेकून दिले. युगाच्या शेवटीही असेच होईल देवदूत येतील आणि वाईट लोकांना नीतिमान लोकांतून वेगळे करतील. आणि त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जिथे रडणे आणि दातखाणे चालेल. “तुम्हाला या सर्वगोष्टी समजल्या काय?” येशूंनी विचारले. “होय,” ते म्हणाले. मग येशू त्यांना म्हणाले, “म्हणून नियमशास्त्राचा प्रत्येक शिक्षक जो स्वर्गाच्या राज्यात शिष्य झाला आहे, तो त्या घरमालकासारखा आहे जो त्याच्या भांडारातून जुने आणि नवे धन काढतो.” येशूंनी हे दाखले सांगण्याचे संपविल्यावर ते तिथून निघाले. स्वतःच्या गावी येऊन, तेथील सभागृहामध्ये असलेल्या लोकांना त्यांनी शिकविण्यास सुरुवात केली आणि ते सर्व आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, “या मनुष्याला हे ज्ञान व चमत्कार करण्याचे सामर्थ्य कुठून प्राप्त झाले? हा सुताराचा मुलगा नाही काय? याच्या आईचे नाव मरीया नाही काय, आणि याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदाह हे त्याचे भाऊ नाहीत काय? याच्या सर्व बहिणी आपल्यातच नाहीत का? मग या मनुष्याला या सर्वगोष्टी कुठून प्राप्त झाल्या?” आणि ते त्याच्यावर संतापले. तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “संदेष्ट्याचा मान होत नाही असे नाही; फक्त आपले गाव आणि आपले घर यांच्यात तो मान्यता पावत नाही.” आणि त्यांच्या अविश्वासामुळे त्यांनी त्या ठिकाणी फार चमत्कार केले नाहीत.