त्याच दिवशी येशू घरातून बाहेर पडले आणि सरोवराच्या किनार्यावर बसले. तेव्हा लोकांनी त्यांच्याभोवती इतकी मोठी गर्दी केली, म्हणून ते एका होडीत बसून किनार्यावर उभे असलेल्या लोकांना शिकवू लागले. अनेक गोष्टी त्यांना दाखल्याद्वारे शिकवीत ते म्हणाले: “एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला. तो बी पेरीत असताना, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तिथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते झटकन उगवले. परंतु सूर्य उगवल्यावर, ती रोपे करपून गेली आणि मूळ नसल्यामुळे वाळून गेली. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले; ते उगवले खरे पण काटेरी झुडूपांनी त्याची वाढ खुंटविली. परंतु काही बी सुपीक जमिनीत पडले आणि जेवढे पेरले होते त्या काही ठिकाणी शंभरपट, साठपट किंवा तीसपट पीक आले. ज्याला ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.”
आणि त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले व त्यांना विचारले, “लोकांशी तुम्ही दाखल्यांनी का बोलता?”
यावर येशूंनी खुलासा केला, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिले आहे, परंतु त्यांना ते दिलेले नाही. कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल, म्हणजे त्यांच्याकडे विपुल असेल. ज्यांच्याजवळ नाही, त्यांच्याजवळ जे असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.
“ते नेहमी पाहत असले, तरी त्यांना दिसत नाही,
ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.
म्हणूनच मी त्यांच्याशी दाखल्यांनी बोलतो! त्यांच्याविषयी यशायाह संदेष्ट्याची ही भविष्यवाणी पूर्ण होत आहे:
“ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही,
ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.
या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा;
त्यांचे कान मंद
आणि त्यांचे डोळे बंद करा.
नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील,
त्यांच्या कानांनी ऐकतील,
अंतःकरणापासून समजतील,
आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.’
परंतु तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहतात; तुमचे कान धन्य आहेत, कारण ते ऐकतात. कारण मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्ही जे पाहिले आणि ऐकले, ते पाहण्याची आणि ऐकण्याची अनेक संदेष्ट्यांनी आणि नीतिमान लोकांनी उत्कंठा बाळगली होती.
“तर पेरणी करणार्याच्या दाखल्याचा अर्थ काय आहे ते ऐका: वाटेवर पडलेले बी अशा हृदयाच्या लोकांचे प्रतीक आहे की, ते परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता ऐकतात पण त्यातील त्यांना काहीही समजत नाही. मग सैतान येतो आणि त्यांच्या हृदयात पेरलेले वचन हिरावून नेतो. खडकाळ जमिनीत पडलेले बी त्यांच्याप्रमाणे आहेत जे वचन ऐकतात आणि तत्काळ आनंदाने स्वीकारतात. परंतु वचनामुळे संकटे आली किंवा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. त्यांना मूळ नसल्यामुळे, ते लवकर नाहीसे होतात. काटेरी झाडांमध्ये पेरलेले बी, जे वचन ऐकतात; परंतु संसाराची चिंता, पैशांची लालसा त्यांना भुरळ पाडते त्यामुळे परमेश्वराच्या वचनाची वाढ खुंटते व फळ देत नाही, त्यांच्याप्रमाणे आहे. परंतु चांगल्या जमिनीत पडलेले बी असा व्यक्ती आहे की जो परमेश्वराचे वचन ऐकतो आणि समजतो आणि मग, जे पेरले होते त्यापेक्षा शंभरपट पीक, साठपट किंवा तीसपट पीक देतो.”
येशूंनी त्यांना दुसरा दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य, आपल्या शेतामध्ये उत्तम प्रतीचे बी पेरणार्या एका मनुष्यासारखे आहे. पण रात्री सर्व झोपलेले असताना त्याचा शत्रू आला. आणि गव्हामध्ये रानगवताचे बी पेरले, आणि निघून गेला. पीक वाढू लागले, आणि दाणे आले तसे त्याच्याबरोबर रानगवतही दिसू लागले.
“तेव्हा शेतातील मजूर मालकाकडे आले आणि म्हणाले, ‘महाराज, शेतात तुम्ही उत्तम प्रतीचे बी पेरले होते की नाही? तर मग रानगवत कुठून आले?’
“तेव्हा मालकाने म्हटले, ‘हे शत्रूने केले आहे.’
“मजुरांनी त्याला विचारले, आम्ही ते उपटून टाकावे काय?
“ ‘नाही,’ मालक म्हणाला, ‘तुम्ही रानगवत उपटून काढीत असताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. तर हंगामापर्यंत दोघांनाही बरोबरच वाढू द्या. त्यावेळी मी कापणी करणार्यांना सांगेन की पहिल्याने रानगवत गोळा करून ते जाळण्यासाठी त्यांच्या पेंढ्या बांधा, मग गहू गोळा करून माझ्या कोठारात आणा.’ ”