YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 22:47-71

लूक 22:47-71 MRCV

ते बोलत असतानाच लोकांचा मोठा जमाव तिथे आला आणि येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक, ज्याला यहूदाह म्हणत होते तो त्यांना मार्ग दाखवित होता. तो येशूंचे चुंबन घ्यावयास जवळ आला, तेव्हा येशूने त्याला विचारले, “यहूदा, चुंबन घेऊन तू मानवपुत्राचा विश्वासघात करतो काय?” आता काय होणार हे शिष्यांनी ओळखले आणि येशूंना विचारले, “प्रभूजी, आम्ही तरवार चालवावी काय?” तेवढ्यात त्यांच्यातील एकाने महायाजकाच्या दासावर वार करून त्याचा उजवा कान कापून टाकला. येशूंनी शिष्यांना म्हटले, “पुरे करा.” आणि त्यांनी त्या मनुष्याचा कान स्पर्श करून बरा केला. नंतर मुख्य याजक, मंदिराच्या द्वारपालांचे अधिकारी आणि वडीलजन यांना येशूंनी म्हटले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय की तुम्ही तरवारी व लाठ्या घेऊन आला आहात? मी दररोज मंदिराच्या परिसरात तुमच्याबरोबर होतो, पण त्यावेळी तुम्ही मला धरले नाही. परंतु आता हीच तुमची वेळ आहे, येथे अंधाराची सत्ता आहे.” शेवटी त्यांनी येशूंना अटक करून महायाजक कयफाच्या घरी नेले. पेत्र काही अंतरावरून, त्यांच्यामागे चालत होता. आणि जेव्हा काहीजणांनी तिथे अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटवली होती आणि एकत्रित खाली बसले होते, पेत्र त्यांच्याबरोबर खाली बसला. एका दासीने त्याला शेकोटीच्या उजेडात बसलेले पाहिले आणि ती त्याच्याकडे निरखून पाहून म्हणाली, “हा मनुष्य येशूंच्या बरोबर होता.” पेत्र नकार देत म्हणाला, “बाई, मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” थोड्या वेळाने दुसर्‍या एकाने त्याच्याकडे पाहून म्हटले, “तू पण त्यांच्यापैकी एक आहेस.” “महाराज, मी तो नाही,” पेत्र नाकारून म्हणाला. सुमारे तासाभराने आणखी एकाने खात्रीपूर्वक विधान केले व पेत्राला म्हटले, “हा मनुष्य त्यांच्याबरोबर होता. कारण तो गालील प्रांताचा आहे!” हे ऐकून पेत्र त्यांना म्हणू लागला, “अरे माणसा, तू काय बोलतोस हे मला समजत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला. प्रभू येशूंनी पेत्राकडे वळून पाहिले तेव्हा त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” पेत्र दूर निघून गेला आणि मोठ्या दुःखाने रडला. मग पहारेकर्‍यांनी त्यांना बुक्क्या मारल्या व त्यांची थट्टा करावयास सुरुवात केली. त्यांनी त्यांचे डोळे बांधले आणि म्हटले, “अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी चापट मारली?” आणि त्यांनी त्यांची वाटेल तशी निंदा केली व अपमान केला. प्रातःकाळ झाल्यावर, लोकांचे वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक आणि दोघेही मुख्य याजक एकत्रित भेटले आणि येशूंना त्यांच्यासमोर आणण्यात आले. ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर तसे आम्हाला सांग.” पण येशू म्हणाले, “जर मी तुम्हाला सांगितले, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, आणि जर मी तुम्हाला विचारले, तर तुम्ही उत्तर देणार नाही. परंतु येथून पुढे मानवपुत्राला सर्वसमर्थ परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले पाहाल.” त्या सर्वांनी विचारले, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता मी आहे.” तेव्हा ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीदारांची काय गरज आहे?” ते आपण स्वतः त्याच्याच तोंडून ऐकले आहे.