“तुम्ही यरुशलेम शहर शत्रुसैन्यांनी वेढलेले पाहाल, तेव्हा त्याचा विनाशकाळ जवळ आला आहे, हे तुमच्या लक्षात येईल. त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे, जे शहरात आहेत त्यांनी ते सोडावे आणि जे बाहेर रानात आहेत, त्यांनी शहरात येण्याचा प्रयत्न करू नये. कारण आता जे सर्व लिहिलेले आहे ते पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत. गर्भवती आणि दूध पाजणार्या स्त्रियांसाठी तर तो काळ क्लेशाचा असेल! कारण पृथ्वीवर महान संकटे कोसळतील आणि लोकांवर क्रोधाचा वर्षाव होईल. काही तलवारीमुळे पडतील आणि काहींना सर्व राष्ट्रांमध्ये कैद करून नेण्यात येईल आणि गैरयहूदीयांचा काळ पूर्ण होईपर्यंत यरुशलेम शहरास गैरयहूदी पायाखाली तुडवतील. “तेव्हा सूर्य, चंद्र व तारे यामध्ये चिन्हे घडतील. पृथ्वीवर राष्ट्रे समुद्राच्या गर्जणार्या लाटांनी हैराण होतील आणि गोंधळून जातील. भीतीमुळे लोक बेशुद्ध पडतील, जगावर काय घडून येणार आहे, या गोष्टीमुळे काळजीत पडतील. कारण आकाशमंडळ डळमळेल. त्यावेळी ते मानवपुत्राला परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशात मेघारूढ होऊन सामर्थ्याने व पराक्रमाने परत येत असलेले पाहाल. या सर्वगोष्टी घडण्यास प्रारंभ होईल, तेव्हा उभे राहा आणि वर नजर लावा कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ आली आहे असे समजा.” नंतर येशूंनी लोकांना हा दाखला सांगितला: “अंजिराच्या झाडाकडे आणि सर्व झाडांकडे पाहा. जेव्हा पालवी फुटू लागते तेव्हा तुम्ही स्वतःच पाहू शकता आणि ओळखता की उन्हाळा जवळ आला आहे. तसेच मी सांगितलेल्या गोष्टी घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा परमेश्वराचे राज्य जवळ आहे हे समजून घ्या. “मी तुम्हाला निश्चित सांगतो की या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत. “सावध राहा! नाही तर तुमची अंतःकरणे दारुबाजी, मद्यपान आणि जीवनातील चिंता यामुळे निराश होतील आणि तो दिवस तुम्हावर अकस्मात एखाद्या पाशासारखा येईल. कारण संपूर्ण पृथ्वीवर राहणार्या सर्व लोकांवर तो येईल. पुढे घडणार्या या सर्व गोष्टीतून सुटण्यास आणि मानवपुत्रासमोर उभे राहण्यास तुम्ही समर्थ व्हावे, म्हणून प्रार्थना करा आणि जागृत राहा.” येशू दररोज मंदिरात शिक्षण देण्यासाठी जात असत, नंतर रोज संध्याकाळी ते जैतून डोंगरावर रात्र घालविण्यासाठी जात असत. आणि सर्व लोक त्यांचे ऐकण्यासाठी सकाळीच मंदिराकडे येत.
लूक 21 वाचा
ऐका लूक 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 21:20-38
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ