YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 15:1-10

लूक 15:1-10 MRCV

आता जकातदार आणि अनेक पापी येशूंचे उपदेश ऐकण्यासाठी आले होते. हे पाहून परूशी आणि नियमशास्त्र शिक्षक तक्रार करू लागले, “येशू पापी लोकांचे स्वागत करतात आणि त्यांच्या पंक्तीस बसून जेवतात.” त्यावेळी येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला: “समजा, एखाद्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातील एक हरवले, तर नव्याण्णव रानात सोडून हरवलेले मेंढरू सापडेपर्यंत त्याला शोधणार नाही काय? ते सापडल्यावर तो त्याला आनंदाने आपल्या खांद्यावर उचलून घेईल आणि घरी येईल. आपल्या मित्रांना आणि शेजार्‍यांना बोलावून म्हणेल, ‘मजबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे.’ त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की ज्या नव्याण्णव नीतिमान लोकांना पश्चात्तापाची गरज नाही, त्यांच्यापेक्षा पश्चात्ताप करणार्‍या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो. “एका स्त्री जवळ चांदीची दहा नाणी असून त्यातील एक हरवले, तर ती दिवा लावून, घर झाडून ते सापडेपर्यंत त्याचा शोध करणार नाही काय? ते तिला सापडल्यावर, आपल्या मैत्रिणींना आणि शेजार्‍यांना बोलावून म्हणते, ‘माझ्याबरोबर आनंद करा, कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’ त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चात्ताप करणार्‍या एका पाप्याबद्दल परमेश्वराच्या दूतांच्या समक्षतेत आनंद केला जातो.”