एका प्रसंगी एक नियमशास्त्र तज्ञ येशूंची परीक्षा पाहावी म्हणून आला, “गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळविण्याकरीता मी काय करावे?” येशू म्हणाले, “याबाबत नियमशास्त्र काय म्हणते? तू काय वाचतोस?” त्याने उत्तर दिले, “ ‘आपला प्रभू परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने’ आणि ‘तुमच्या पूर्ण शक्तीने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर.’” “अगदी बरोबर सांगितलेस,” येशू म्हणाले, “तसेच कर म्हणजे तू जगशील.” तरी आपले न्यायीपणाचे समर्थन करण्यासाठी त्याने येशूंना विचारले, “माझा शेजारी कोण?” उत्तर देत येशू म्हणाले: “एक मनुष्य खाली यरुशलेमाहून यरीहोला जात असताना, चोरांनी त्याच्यावर हल्ला केला, कपडे हिसकावून घेतले, मारहाण केली आणि त्याला अर्धमेल्या अवस्थेत टाकून ते निघून गेले. एक याजक त्या बाजूने आला आणि त्या मनुष्याला तेथे पडलेले पाहून, रस्ता ओलांडून निघून गेला. त्याचप्रमाणे एक लेवी आला, त्याने त्याला पाहिले, पण तो तसाच पुढे गेला. नंतर एक शोमरोनी, प्रवास करीत जेथे तो होता तेथे आला आणि पाहून, त्याला त्याचा कळवळा आला. त्याच्याजवळ जाऊन त्या मनुष्याने त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून पट्ट्या बांधल्या. त्याला आपल्या गाढवावर बसवून तो एका उतारशाळेत आला आणि त्याने त्याची सेवा केली. दुसर्या दिवशी त्याने उतारशाळेच्या मालकाला चांदीची दोन नाणी देऊन सांगितले, ‘या माणसाची काळजी घ्या,’ आणि ‘मी परत येईन, त्यावेळी जास्त खर्च झाला असेल तर त्याची भरपाई करीन.’ “आता या तिघांपैकी चोरांच्या हाती सापडलेल्या मनुष्याचा शेजारी कोण होता असे तुला वाटते?” त्या नियमशास्त्रज्ञाने उत्तर दिले, “ज्याने त्याला दया दाखविली, तोच.” यावर येशू त्याला म्हणाले, “जा आणि असेच कर.”
लूक 10 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 10:25-37
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ