YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 1:21-38

लूक 1:21-38 MRCV

इकडे लोक जखर्‍याहची वाट पाहत होते. तो मंदिरात इतका वेळ का थांबला याचे त्यांना आश्चर्य वाटले. तो बाहेर आला तेव्हा त्याला त्यांच्याशी बोलता येईना. यावरून त्याने मंदिरात दृष्टान्त पाहिला असेल हे त्यांनी ओळखले, मात्र बोलू न शकल्यामुळे तो त्यांना खुणा करीत होता. मग त्याच्या सेवाकार्याचा काळ संपला व तो घरी परतला. त्यानंतर त्याची पत्नी अलीशिबा गर्भवती झाली आणि पाच महिने एकांतवासात राहिली. ती म्हणाली, “प्रभूने हे माझ्यासाठी केले आहे, या दिवसांमध्ये त्यांची कृपादृष्टी मजवर करून लोकांमध्ये होणारी माझी मानहानी दूर केली आहे.” अलीशिबेला गर्भवती होऊन सहा महिने झाले असताना, परमेश्वराने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावात, एका कुमारीकडे पाठविले, जिचा विवाह दावीद राजाच्या वंशावळीतील योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर निश्चित झाला होता. त्या कुमारीचे नाव मरीया होते. गब्रीएल देवदूत मरीयेपुढे प्रगट झाला आणि तिला म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रिये, अभिवादन! प्रभू तुझ्याबरोबर आहेत.” देवदूताच्या शब्दांनी मरीया फारच अस्वस्थ झाली आणि हे अभिवादन कशाप्रकारचे असावे, याविषयी ती विचार करू लागली. देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस; कारण परमेश्वराची कृपा तुझ्यावर झाली आहे. तू गर्भधारण करून पुत्राला जन्म देशील आणि त्याचे नाव येशू ठेवावे. ते परमथोर होतील आणि त्यांना परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू परमेश्वर त्यांना त्यांचा पूर्वज दावीदाचे सिंहासन देतील. ते याकोबाच्या संतानांवर सदासर्वकाळ राज्य करतील व त्यांच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.” मरीयेने देवदूताला विचारले, “हे कसे होईल? मी तर कुमारिका आहे!” यावर देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल आणि सर्वोच्च परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. त्यामुळे जो पवित्र पुत्र तुला होणार आहे त्यांना परमेश्वराचा पुत्र म्हणतील. तुझी नातलग अलीशिबा हिलासुद्धा तिच्या वृद्धापकाळात बाळ होणार आहे आणि जी गर्भधारणा करू शकत नव्हती, तिला आता सहावा महिना आहे. कारण परमेश्वराला कोणतेही वचन पूर्ण करणे अशक्य नाही.” मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, तुम्ही जे वचन मला दिले आहे त्याची पूर्तता होवो.” आणि मग देवदूत तिला सोडून गेला.

लूक 1 वाचा

ऐका लूक 1