आम्हामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचा वृतांत संग्रहित करण्याचे काम अनेकांनी हाती घेतले. या घटनांचे वृतांत प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रथम साक्षीदारांनी व परमेश्वराच्या वचनाची सेवा करणार्यांनी आमच्याकडे सोपविलेले आहेत. सन्माननीय थियफिल, तुमच्यासाठी एक अचूक व अधिकृत वृतांत लिहून काढावा, हे मनात ठेऊन मी स्वतःसुद्धा प्रत्येक गोष्टीचा अगदी सुरुवातीपासून बारकाईने व काळजीपूर्वक शोध केला आहे. यासाठी की, ज्यागोष्टी तुम्हाला शिकविण्यात आल्या आहेत, त्यांची तुम्हाला खात्री होईल. यहूदीयाचा राजा हेरोद याच्या काळात तिथे जखर्याह नावाचा एक याजक होता, तो अबीयाच्या याजकवर्गातील होता; त्याची पत्नी अलीशिबासुद्धा अहरोनाच्या वंशाची होती. दोघेही परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान असून प्रभूच्या आज्ञा व नियम पालन करण्यामध्ये निर्दोष होते. त्यांना मूलबाळ नव्हते, कारण अलीशिबा गर्भधारण करू शकत नव्हती आणि ती दोघेही खूप वयस्कर झालेली होती. एकदा आपल्या गटाच्या अनुक्रमाने जखर्याह परमेश्वरापुढे याजक म्हणून सेवा करीत असताना, परमेश्वराच्या मंदिरात जाऊन धूप जाळण्यासाठी याजकांच्या रीतीप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. आणि जेव्हा धूप जाळण्याची वेळ आली तेव्हा, जमलेले सर्व भक्तजन बाहेर प्रार्थना करीत होते. तेव्हा जखर्याहच्या समोर प्रभूचा एक दूत प्रगट झाला, तो धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिला. त्याला पाहताच जखर्याह चकित आणि भयभीत झाला. पण देवदूत त्याला म्हणाला, “जखर्याह भिऊ नकोस, कारण परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझी पत्नी अलीशिबा तुझ्यासाठी एक पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव योहान असे ठेव. तो तुला आनंद व उल्हास होईल आणि त्याच्या जन्मामुळे अनेकांना हर्ष वाटेल. तो प्रभूच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल. तो अनेक इस्राएली लोकांना प्रभू त्यांच्या परमेश्वराकडे परत घेऊन येईल. तो एलीयाहच्या आत्म्याने व सामर्थ्याने प्रभूच्या पुढे चालेल, आईवडिलांची हृदये त्यांच्या लेकरांकडे वळवेल व अवज्ञा करणार्यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवेल व लोकांना प्रभूच्या मार्गाप्रमाणे चालण्यासाठी तयार करेल.” जखर्याह देवदूताला म्हणाला, “मी याबद्दल खात्री कशी बाळगावी? मी वयस्क मनुष्य आहे आणि माझ्या पत्नीचेही वय होऊन गेले आहे.” यावर देवदूत म्हणाला, “मी गब्रीएल आहे. मी प्रत्यक्ष परमेश्वराच्या समक्षतेत उभा असतो आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही शुभवार्ता तुला सांगण्यासाठी मला पाठविण्यात आले आहे, आणि आता हे पूर्ण होईल त्या दिवसापर्यंत तू मुका होशील व तुला बोलता येणार नाही, कारण नेमलेल्या समयी माझे शब्द खरे होतील या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाही.” इकडे लोक जखर्याहची वाट पाहत होते. तो मंदिरात इतका वेळ का थांबला याचे त्यांना आश्चर्य वाटले. तो बाहेर आला तेव्हा त्याला त्यांच्याशी बोलता येईना. यावरून त्याने मंदिरात दृष्टान्त पाहिला असेल हे त्यांनी ओळखले, मात्र बोलू न शकल्यामुळे तो त्यांना खुणा करीत होता. मग त्याच्या सेवाकार्याचा काळ संपला व तो घरी परतला.
लूक 1 वाचा
ऐका लूक 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 1:1-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ