अहरोनाचे पुत्र नादाब व अबीहू यांनी आपआपल्या धुपाटण्यात अग्नी भरून, त्यावर धूप ठेवून तो अनाधिकृत अग्नी याहवेहसमोर नेला, जे याहवेहच्या आज्ञेविरुद्ध होते. म्हणून याहवेहकडून अग्नी निघाला आणि त्याने त्यांना भस्म केले आणि ते याहवेहसमोर मरण पावले. तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला, “याहवेहने जे सांगितले ते असे: “ ‘जे माझ्याजवळ येतात त्यांना मी दाखवेन की मी पवित्र आहे; सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल.’ ” यावर अहरोन शांत राहिला. मग मोशेने अहरोनाचा चुलता उज्जीएलाचे पुत्र मिशाएल व एलसाफान यांना बोलावून सांगितले, “तुम्ही इकडे या आणि पवित्र स्थानासमोरील तुमच्या भावांची शरीरे उचलून छावणीबाहेर न्या.” तेव्हा मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी जाऊन ती उचलली आणि त्यांच्या अंगरख्यांसह ती बाहेर नेली. मग मोशे अहरोन व त्याचे पुत्र एलअज़ार व इथामार यांना म्हणाला, “तुमचे केस न विंचरलेले असे मोकळे सोडू नका व तुमची वस्त्रे कधी फाडू नका, नाहीतर तुम्ही मराल आणि याहवेह तुम्हा सर्व समुदायावर रागावतील. परंतु तुमचे नातेवाईक, सर्व इस्राएली लोक याहवेहनी अग्नीने नाश केलेल्या लोकांबद्दल शोक करतील. सभामंडपाचे प्रवेशद्वार सोडू नका, नाही तर तुम्ही मराल, कारण याहवेहच्या अभिषेकाचे तेल तुम्हावर आहे.” तेव्हा त्यांनी मोशेच्या आज्ञेप्रमाणे केले. मग याहवेहने अहरोनाला आज्ञा दिली, “तू सभामंडपात जाशील तेव्हा द्राक्षारस किंवा कोणतेही आंबवलेले पेय पिऊन तिथे जाऊ नकोस, नाहीतर तू मरशील. हा नियम तुझ्या पुत्रांना व त्यांच्या पुत्र पौत्रांना पिढ्यान् पिढ्या लागू आहे, यासाठी की पवित्र व अपवित्र, शुद्ध व अशुद्ध यातील भेद तुला कळेल. आणि याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञांचे शिक्षण इस्राएली लोकांना देणे हे तुमचे कर्तव्य राहील.”
लेवीय 10 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 10:1-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ