तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “आम्ही आमच्या याहवेहचा त्याग करून इतर दैवतांची सेवा करणे असे आमच्या हातून कधी न घडो! याहवेह आमच्या परमेश्वरांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना इजिप्तमधून, त्या गुलामगिरीच्या देशातून बाहेर काढले आणि आमच्या डोळ्यांपुढे ते महान चमत्कार केले. आमच्या संपूर्ण प्रवासात आणि ज्या प्रदेशातून आम्ही प्रवास केला त्या सर्व प्रवासात आमचे संरक्षण केले. आणि याहवेहने जे अमोरी लोक त्या देशात राहत होते त्यांच्यासहित सर्व राष्ट्रांना आमच्या समोरून बाहेर घालवून दिले. आम्हीही याहवेहचीच सेवा करणार, कारण ते आमचे परमेश्वर आहेत.” यहोशुआ लोकांना म्हणाला, “तुमच्याने याहवेहची सेवा करविणार नाही. ते पवित्र परमेश्वर आहे; ते ईर्ष्यावान परमेश्वर आहेत. ते तुमच्या बंडाची आणि तुमच्या पातकांची क्षमा करणार नाही. जर तुम्ही याहवेहचा त्याग कराल आणि परदेशी दैवताची सेवा कराल, जरी इतका काळ ते तुमच्याबरोबर चांगले राहिले आहेत, तरी ते उलटून तुमच्यावर संकट आणून तुमचा अंत करतील.” परंतु लोक यहोशुआला म्हणाले, “नाही! आम्ही याहवेहचीच सेवा करणार.” तेव्हा यहोशुआ लोकांस म्हणाला, “तुम्ही याहवेहची सेवा करण्याचे निवडले आहे, याला तुम्ही स्वतःच साक्षीदार आहात.” त्यांनी उत्तर दिले. “होय, आम्ही साक्षीदार आहोत.” तेव्हा यहोशुआ म्हणाला, “तर आता तुमच्यामध्ये जे परदेशी दैवते आहेत ती टाकून द्या आणि तुमची अंतःकरणे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराकडे लावा.” लोकांनी यहोशुआला उत्तर दिले, “आम्ही याहवेह आमचे परमेश्वर यांचीच सेवा करू आणि त्यांच्याच आज्ञा पाळू.” त्या दिवशी यहोशुआने इस्राएली लोकांशी एक करार केला, आणि शेखेम येथे त्याने त्यांच्यासाठी नियम आणि आज्ञा पुन्हा निश्चित करून घेतल्या. तेव्हा यहोशुआने या सर्व गोष्टींची नोंद परमेश्वराच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात केली. नंतर त्याने एक मोठी धोंड घेतली आणि याहवेहच्या पवित्रस्थानाजवळ एला वृक्षाखाली ठेवली. नंतर यहोशुआ सर्व लोकांस म्हणाला, “पाहा, ही धोंड आपल्याविरुद्ध साक्ष असेल. याहवेह जे आपल्याशी बोलले तो प्रत्येक शब्द तिने ऐकला आहे. जर तुम्ही तुमच्या परमेश्वराबरोबर खरेपणाने राहिला नाहीत तर ती तुमच्याविरुद्ध साक्ष देईल.” नंतर यहोशुआने त्या लोकांना आपआपल्या वतनास पाठवून दिले. या गोष्टीनंतर, याहवेहचा सेवक नूनाचा पुत्र यहोशुआ वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला. आणि त्यांनी त्याला गाश पर्वतांच्या उत्तरेला असलेल्या एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-सेरह येथे त्याच्याच वतनभागात पुरले. इस्राएली लोकांनी यहोशुआच्या सर्व आयुष्यात आणि त्याच्या मृत्यूनंतरही जे वडीलजन जिवंत राहिले आणि याहवेहने इस्राएलसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा ज्यांनी अनुभव घेतला, त्यांनी याहवेहची सेवा केली. योसेफाच्या ज्या अस्थी इस्राएली लोकांनी इजिप्त येथून आणल्या होत्या, त्या शेखेम येथे जी जागा याकोबाने हमोराच्या पुत्रांकडून चांदीच्या शंभर नाण्यांस विकत घेतलेली होती तिथे पुरल्या. हे योसेफाच्या वंशजांचे वतन झाले. अहरोनाचा पुत्र एलअज़ार मरण पावला आणि त्याला एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गिबियाह येथे पुरण्यात आले. जे त्याचा पुत्र फिनहासला वतन म्हणून देण्यात आले होते.
यहोशुआ 24 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहोशुआ 24:16-33
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ