YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 9:24-41

योहान 9:24-41 MRCV

तेव्हा जो मनुष्य पूर्वी आंधळा होता, त्याला त्यांनी पुन्हा दुसर्‍यांदा बोलावून सांगितले, “सत्य सांगून परमेश्वराचे गौरव कर, हा मनुष्य पापी आहे, हे आम्हाला माहीत आहे.” त्यावर तो म्हणाला, “तो पापी आहे की नाही, हे मला ठाऊक नाही. परंतु मला एक गोष्ट माहीत आहे. मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते!” त्यांनी त्याला विचारले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले?” तेव्हा त्याने उत्तर दिले, “मी या आधीच तुम्हाला सांगितले; पण तुम्ही ऐकले नाही. ते पुन्हा का ऐकता? त्यांचे शिष्य व्हावे अशी तुमची इच्छा आहे काय?” त्यावर त्यांनी त्याची निंदा केली व ते म्हणाले, “तूच त्याचा शिष्य आहेस! आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत! आम्हाला माहीत आहे की परमेश्वर मोशेशी बोलले, परंतु याच्याबद्दल म्हणशील, तर तो कुठला आहे हे आम्हास ठाऊक देखील नाही.” तेव्हा त्याने उत्तर दिले, “हे केवढे आश्चर्य आहे! त्याने माझे डोळे उघडले आणि तो मात्र कुठून आला याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही! आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वर पापी लोकांचे ऐकत नाही. तर जे कोणी परमेश्वर भक्त असून त्यांच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्यांचेच ते ऐकतात. कोणी जन्माधांचे डोळे उघडले, असे कधीच ऐकण्यात आले नाही. ही व्यक्ती परमेश्वरापासून नसती, तर हे करू शकली नसती.” तेव्हा यहूदी पुढारी म्हणाले, “तू जन्मापासून पापात बुडलेला आहेस आणि आम्हाला शिकवितोस?” आणि त्यांनी त्याला बाहेर घालविले. त्यांनी त्याला बाहेर घालविले, हे येशूंनी ऐकले आणि तो त्यांना भेटल्यावर, येशूंनी त्याला विचारले, “तुझा मानवपुत्रावर विश्वास आहे का?” तो म्हणाला, “प्रभू, ते कोण हे मला सांगा म्हणजे मी त्यांच्यावर विश्वास ठेवेन.” येशू म्हणाले, “आता तू त्याला पाहिले आहेस आणि खरेतर तो तुझ्याशी बोलत आहे.” “होय प्रभूजी,” तो म्हणाला, “मी विश्वास धरतो!” आणि त्याने त्यांची उपासना केली. मग येशू म्हणाले, “मी न्याय करण्यासाठी या जगात आलो आहे, यासाठी की आंधळ्यांना दिसावे आणि जे पाहतात त्यांनी आंधळे व्हावे.” जे परूशी तिथे होते त्यांनी जे बोलले ते ऐकले आणि विचारले, “आम्ही आंधळे आहोत काय?” येशू म्हणाले, “तुम्ही आंधळे असता, तर तुम्ही पापी नसता; परंतु तुम्हाला दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचा दोष तसाच राहतो.”

योहान 9:24-41 साठी चलचित्र