YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 6:30-59

योहान 6:30-59 MRCV

त्यावर ते म्हणाले, “आम्ही पाहून विश्वास ठेवावा असे आपणास वाटत असेल, तर आपण आम्हाला आणखी कोणती चिन्हे द्याल? आपण काय कराल? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला व असे लिहिले आहे: ‘त्यांनी त्यांना खाण्यासाठी स्वर्गातून भाकर दिली.’” येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, ज्यांनी तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली तो मोशे नव्हता, परंतु माझा पिता जो स्वर्गातील खरी भाकर तुम्हाला देत आहे. ही परमेश्वराची भाकर आहे, जी स्वर्गातून उतरली आहे आणि जगाला जीवन देते.” ते म्हणाले, “प्रभूजी, हीच भाकर आपण आम्हाला नेहमी द्या.” त्यावर येशू जाहीरपणे म्हणाले, “मीच जीवनाची भाकर आहे. जो मजकडे येतो त्याला पुन्हा कधीही भूक लागणार नाही आणि जो मजवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही मला प्रत्यक्ष पाहता तरी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. जे सर्वजण पिता मला देतात, ते माझ्याकडे येतील आणि जे माझ्याकडे येतील त्यांना मी कधीच घालवून देणार नाही. कारण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्यांनी मला पाठविले आहे, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वर्गातून उतरलो आहे. आणि ज्यांनी मला पाठविले त्यांची इच्छा हीच आहे की त्यांनी जे मला दिलेले आहेत, त्यातील एकालाही मी हरवू नये, तर त्यांना शेवटच्या दिवशी मरणातून उठवावे. कारण माझ्या पित्याची इच्छा ही आहे की जे प्रत्येकजण पुत्राकडे पाहतात व त्याजवर विश्वास ठेवतात, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि मी शेवटच्या दिवशी त्यांना उठवेन.” मी, “स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,” या त्यांच्या विधानामुळे यहूदी पुढारी त्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले. ते म्हणाले, “हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना, ज्याच्या आईवडिलांना आपण चांगले ओळखतो नाही का? ‘आपण स्वर्गातून आलो आहोत.’ हे कसे म्हणतो?” हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “आपसात कुरकुर करू नका, ज्यांनी मला पाठविले त्या पित्याने आकर्षून घेतल्यावाचून कोणीही मजकडे येऊ शकत नाही आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात असा शास्त्रलेख आहे: ‘त्या सर्वांना परमेश्वर शिकवतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून त्यांच्यापासून शिकला आहे तो मजकडे येतो. जो परमेश्वरापासून आहे त्याच्याशिवाय पित्याला कोणीही पाहिले नाही. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळालेच आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला, तरी ते मरण पावले. परंतु ही भाकर जी स्वर्गातून उतरलेली आहे, ती जे कोणी खातील ते मरणार नाही. मी ती स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जे कोणीही भाकर खातील, ते सदासर्वकाळ जगतील. ही भाकर माझे शरीर आहे, जी जगाच्या जीवनासाठी मी देणार आहे.” यास्तव यहूदी पुढारी आपसात तीव्र वाद करू लागले, “हा मनुष्य त्याचा देह आम्हास कसा खावयास देऊ शकेल?” येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, जोपर्यंत तुम्ही मानवपुत्राचा देह खात नाही व त्याचे रक्त पीत नाही, तोपर्यंत तुम्हामध्ये जीवन नाही. जो कोणी माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन मिळते आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन. कारण माझा देह हे खरे अन्न आहे आणि माझे रक्त हे खरे पेय आहे. जे माझा देह खातात व माझे रक्त पितात, ते माझ्यामध्ये राहतात आणि मी त्यांच्यामध्ये राहतो. मला पाठविणार्‍या जिवंत पित्यामुळे मी जगतो. तसेच ज्यांचे पोषण माझ्यावर होते तो प्रत्येकजण माझ्यामुळे जगेल. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला आणि मरण पावले, परंतु ज्या कोणाचे पोषण या भाकरीवर होते ते सदासर्वकाळ जगतील.” येशूंनी हे शिक्षण कफर्णहूमातील सभागृहामध्ये दिले.