तेव्हा एक शोमरोनी स्त्री पाणी काढण्यासाठी आली, येशूंनी तिला म्हटले, “तू मला पाणी प्यावयास देशील का?” त्यांचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेलेले होते.
तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्यांना म्हणाली, “आपण यहूदी आहात व मी एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही मजजवळ पाणी कसे मागू शकता?” (कारण यहूदी लोक शोमरोनी लोकांशी संबंध ठेवीत नसत.)
येशू तिला म्हणाले, “परमेश्वराचे वरदान आणि मला प्यावयाला पाणी दे असे म्हणणारा कोण, हे जर तुला कळले असते तर तू त्यांच्याजवळ मागितले असते आणि त्यांनी तुला जिवंत पाणी दिले असते.”
“महाराज,” ती स्त्री म्हणाली, “परंतु आपल्याजवळ पाणी काढण्यासाठी पोहरा नाही आणि विहीर तर खूप खोल आहे. हे जिवंत पाणी आपणाकडे कुठून येणार? आमचा पिता याकोबाने आम्हाला ही विहीर दिली होती व ते स्वतः, त्यांची गुरे आणि त्याचे पुत्रही हे पाणी पीत असत, त्यांच्यापेक्षा आपण थोर आहात काय?”
येशूंनी तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु जे पाणी मी देतो ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. खरोखर, जे पाणी मी त्यांना देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी जिवंत पाण्याचा झरा असे होईल.”
ती स्त्री म्हणाली, “महाराज, मला हे पाणी द्या, म्हणजे मला तहान लागणार नाही आणि सतत पाणी काढण्यासाठी येथे येण्याची गरजही पडणार नाही.”
येशूंनी तिला सांगितले, “जा आणि तुझ्या पतीला इकडे बोलावून आण.”
परंतु ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.”
त्यावर येशू म्हणाले, “मला पती नाही हे जे तू म्हणतेस ते अगदी खरे आहे. कारण वस्तुस्थिती अशी आहे की तुला पाच पती होते आणि जो पुरुष सध्या तुझ्याबरोबर आहे, तो तुझा पती नाही. तू जे काही सांगितले, ते सर्व सत्य आहे.”
“महाराज,” ती स्त्री उद्गारली, “आपण खरोखर संदेष्टे आहात असे मला दिसते. आमच्या पूर्वजांनी या डोंगरावर परमेश्वराची उपासना केली, परंतु तुम्ही यहूदी, उपासनेचे स्थान यरुशलेममध्येच आहे असा आग्रह धरता.”
येशू तिला म्हणाले, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव, अशी वेळ येईल की त्यावेळी तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर किंवा यरुशलेमात करणार नाही. तुम्ही शोमरोनी तुम्हाला माहीत नाही, अशाची उपासना करता; पण जो आम्हाला माहीत आहे आम्ही त्याची उपासना करतो. कारण उद्धार यहूदी लोकांपासून आहे. अशी वेळ येत आहे आणि आली आहे की खरे उपासक पित्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करतील. पिता अशाच प्रकारच्या उपासकांना शोधीत आहे. परमेश्वर आत्मा आहे आणि त्यांच्या भक्तांनी त्यांची उपासना आत्म्याने व खरेपणानेच करावयास पाहिजेत.”
ती स्त्री म्हणाली, “मला माहीत आहे की, ख्रिस्त म्हणतात तो मसिहा येणार आहे आणि तो आला म्हणजे सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करून सांगेल.”
यावर येशूंनी जाहीरपणे सांगितले, “मी, तुजबरोबर बोलत आहे तोच मी आहे.”
त्यांचे शिष्य परतले आणि ते एका बाईशी बोलत आहेत हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु, “तुम्हाला काय हवे आहे?” किंवा “तिच्याबरोबर कसला संवाद करीत होते?” असे त्यांना त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही.
मग, तिने आपली पाण्याची घागर तिथेच सोडली आणि नगरात जाऊन लोकांना म्हणाली, “चला, या मनुष्याला पाहा, मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली. तोच ख्रिस्त असू शकेल का?” तेव्हा ते नगरातून बाहेर आले व त्यांच्याकडे वाटचाल करू लागले.