कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परमेश्वराने आपल्या पुत्राला या जगामध्ये, जगाला दोष लावण्यासाठी नव्हे तर, त्यांच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले आहे. जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो तो दोषरहित ठरेल, परंतु जो विश्वास ठेवीत नाही तो दोषी ठरविण्यात आला आहे, कारण त्याने परमेश्वराच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवण्याचे नाकारले. निर्णय हाच आहे: प्रकाश या जगात आला आहे, परंतु लोकांनी प्रकाशाऐवजी अंधकाराची अधिक आवड धरली; कारण त्यांची कर्मे दुष्ट होती. दुष्कृत्ये करणारा प्रत्येकजण प्रकाशाचा द्वेष करतो आणि प्रकाशाकडे येत नाही, कारण आपली दुष्कृत्ये प्रकट होतील अशी त्याला भीती वाटते. परंतु जो सत्याने जीवन जगतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की जे काही त्यांनी केले ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य आहे, हे स्पष्ट दिसून यावे.
त्यानंतर, येशू आणि त्यांचे शिष्य यहूदीया प्रांतात आले आणि तिथे थोडा वेळ त्यांच्याबरोबर घालविला आणि बाप्तिस्मे केले. आता योहान शालिमाजवळ असलेले एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता, कारण तिथे विपुल प्रमाणात पाणी असून, लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी येत असत. त्या वेळेपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता. कोणाएका यहूदी मनुष्याने योहानाच्या शिष्यांबरोबर शुद्धीकरणाच्या विधीबद्दल वादविवाद केला. तेव्हा शिष्य योहानाकडे आले आणि म्हणाले, “गुरुजी, यार्देन नदीच्या पलीकडे जो मनुष्य आपल्याबरोबर होता व ज्यांच्याबद्दल आपण साक्ष दिली, ते बाप्तिस्मा करीत आहेत आणि पाहा, प्रत्येकजण त्यांच्याकडे जात आहे.”
त्यावर योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला जे काही स्वर्गातून दिले जाईल तेच प्राप्त होईल. ‘मी ख्रिस्त नव्हे, परंतु त्यांच्यापुढे मला पाठविण्यात आले आहे,’ असे मी म्हटले होते याचे साक्षी तुम्हीच आहात. वधू वराची असते. वराचा मित्र जवळ थांबून त्याचे भाषण ऐकतो, वराचा आवाज ऐकून त्याचा आनंद पूर्ण होतो, तो आनंद माझा आहे आणि आता तो परिपूर्ण झाला आहे. ते अधिक थोर होवो आणि मी लहान व्हावे.”
जो स्वर्गातून आलेला आहे तो इतर सर्वांपेक्षा थोर आहे. जो जगापासून आहे तो जगाचा आहे; व जगातील विषयांच्या बाबतीत बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांहून थोर आहे. त्यांनी जे पाहिले व ऐकले त्याविषयी ते साक्ष देतात, परंतु त्यांची साक्ष कोणीच मान्य करत नाही. जे कोणी त्यांची साक्ष स्वीकारतात, त्यांनी असे प्रमाणित केले की परमेश्वर सत्य आहे. ज्या कोणाला परमेश्वराने पाठविले, ते परमेश्वराची वचने बोलतात, कारण परमेश्वर विपुलतेचा आत्मा देतात. पिता पुत्रावर प्रीती करतात आणि त्याने प्रत्येक गोष्ट त्यांच्या हाती सोपविली आहे. जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन आहे; परंतु जो कोणी पुत्राला नाकारतो, तो जीवन पाहणार नाही, पण परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर राहील.