सैनिकांनी येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांनी त्यांची वस्त्रे घेतली आणि एकाएका सैनिकाला एक असे त्याचे चार विभागामध्ये वाटप केले, फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा अंगरखा शिवलेला नसून वरपासून खालपर्यंत संपूर्ण विणलेला होता.
ते एकमेकांना म्हणाले, “त्याचा अंगरखा आपण फाडू नये, आपणापैकी तो कोणाला मिळावा, हे पाहण्यासाठी आपण चिठ्ठ्या टाकू या.”
यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाला:
“त्यांनी माझी वस्त्रे आपसात वाटून घेतली,
आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकल्या.”
म्हणूनच त्या सैनिकांनी याप्रमाणे केले.
क्रूसाच्या जवळ येशूंची आई व तिची बहीण, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालिया उभ्या होत्या. मग येशूंनी आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्यांची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा पुत्र!” आणि त्यांनी त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
यानंतर सर्वगोष्टी पूर्ण झाल्या आहेत हे जाणून शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशूंनी म्हटले, “मला तहान लागली आहे.” तिथे शिरक्यात भिजविलेला एक स्पंज एजोबाच्या काठीवर ठेवून व काठी उंच करून त्यांनी येशूंच्या ओठांना लावला. तो चाखल्यावर, येशू म्हणाले, “पूर्ण झाले आहे,” आणि त्यांनी मस्तक लववून प्राण सोडला.
आता क्रूसावर खिळलेल्यांची शरीरे दुसर्या दिवसापर्यंत लटकत राहू नयेत, अशी यहूदी पुढार्यांची इच्छा होती. कारण हा तयारीचा दिवस होता आणि दुसरा दिवस हा एक विशेष शब्बाथ होता. म्हणून त्यांचे पाय मोडण्याचा हुकूम द्यावा, अशी विनंती त्यांनी पिलाताला केली, मग त्यांची शरीरे उतरवून घेता येतील. त्याप्रमाणे सैनिकांनी येशूंबरोबर क्रूसावर टांगलेल्या पहिल्याचे पाय मोडले मग दुसर्याचे ही मोडले. परंतु जेव्हा ते येशूंजवळ आले, तेव्हा ते आधीच मरण पावल्याचे त्यांना दिसून आले, म्हणून त्यांनी येशूंचे पाय मोडले नाहीत. तरीपण, सैनिकांपैकी एकाने त्यांच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा रक्त व पाण्याचा ओघ बाहेर पडला. ज्या मनुष्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आणि त्याची साक्ष खरी आहे. त्याला माहीत आहे की तो सत्य बोलत आहे आणि तो साक्ष देतो यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा. सैनिकांनी जे केले त्यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाले: “त्याच्या हाडांपैकी एकही हाड मोडले जाणार नाही,” आणि आणखी एक शास्त्रलेख असा आहे, “ज्याला त्यांनी भोसकले ते त्याच्याकडे पाहतील.”
त्यानंतर अरिमथियाकर योसेफाने येशूंचे शरीर पिलाताकडे मागितले. आता योसेफ येशूंचा एक गुप्त अनुयायी असून यहूदी पुढार्यांना भीत होता. पिलाताच्या परवानगीने, तो आला आणि येशूंचे शरीर घेऊन गेला. जो येशूंकडे रात्री आलेला होता, तो निकदेमही त्याच्याबरोबर होता व त्याने आपल्याबरोबर गंधरस व अगरू यांचे सुमारे चौतीस कि.ग्रॅ. मिश्रण आणले होते. येशूंचे शरीर घेऊन त्या दोघांनी ते सुगंधी द्रव्यासह तागाच्या वस्त्राने गुंडाळले. हे यहूद्यांच्या उत्तरक्रियेच्या रीतीप्रमाणे होते. ज्या ठिकाणी येशूंना क्रूसावर खिळले होते त्या ठिकाणी एक बाग होती आणि त्या बागेत एक नवीन कबर होती, त्यामध्ये आतापर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. शब्बाथ सुरू होण्यापूर्वी सर्वकाही उरकण्याची घाई होती व ही कबर जवळच होती, म्हणून त्यांनी येशूंचे शरीर त्याच कबरेत ठेवले.