त्यांची प्रार्थना आटोपल्यावर, येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेले. दुसर्या बाजूला एक बाग होती, ते व त्यांचे शिष्य तिथे गेले.
आता यहूदा, ज्याने त्यांचा विश्वासघात केला, त्याला ही जागा माहीत होती, कारण येशू आपल्या शिष्यांना बर्याच वेळा तिथे भेटत होते. तेव्हा सैनिकांची एक तुकडी, महायाजक आणि परूश्यांकडील अधिकाऱ्यांना वाट दाखवित यहूदाह त्यांना बागेत घेऊन आला. त्यांच्याजवळ मशाली, कंदिले व हत्यारे होती.
येशू, जे सर्व आपल्यासोबत घडणार होते ते पूर्णपणे जाणून होते, त्यांनी बाहेर जाऊन त्यांना विचारले, “तुम्हाला कोण हवे आहे?”
त्यावर त्यांनी उत्तर दिले, “नासरेथकर येशू.”
तेव्हा येशू म्हणाले, “तो मी आहे,” आणि विश्वासघात करणारा यहूदाही त्यांच्याबरोबर तिथे उभा होता. जेव्हा येशूने म्हटले, “मी तो आहे,” तेव्हा ते मागे सरकून भूमीवर पडले.
त्यांना पुन्हा विचारले, “तुम्हाला कोण हवे आहे?”
त्यांनी म्हटले, “नासरेथकर येशू.”
येशू म्हणाले, “तो मी आहे असे मी तुम्हाला सांगितले आहेच, आणि जर तुम्ही मला शोधत आहात, तर या माणसांना जाऊ द्यावे. जे तुम्ही मला दिले आहेत त्यातून मी एकही हरविला नाही,” हे शब्द त्यांनी सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
तेव्हा शिमोन पेत्राजवळ तरवार होती, ती तरवार उपसून त्याने महायाजकाच्या दासावर वार केला व त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते.
येशूंनी पेत्रास आज्ञा केली, “तुझी तलवार म्यानात घाल! पित्याने मला दिलेल्या प्याल्यातून मी पिऊ नये काय?”
मग यहूदी अधिकार्यांनी, सैनिकांनी व त्यांच्या सेनापतींनी येशूंना अटक केली. त्यांना बंदी बनविले. प्रथम त्यांनी येशूंना त्या वर्षाचा महायाजक कयफाचा सासरा हन्नाकडे नेले. याच कयफाने यहूदी पुढार्यांसोबत अशी मसलत केली होती की, लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे हिताचे आहे.
शिमोन पेत्र आणि आणखी एक शिष्य येशूंच्या मागे आले. कारण हा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा असल्यामुळे, त्याने येशूंबरोबर महायाजकाच्या अंगणात प्रवेश केला. परंतु पेत्राला बाहेर दाराजवळ थांबावे लागले. तो दुसरा शिष्य, ज्याला मुख्य याजकाची ओळख होती, तो परत आला व दारावर राखण ठेवणार्या दासीशी बोलला व त्यांनी पेत्राला आत आणले.
मग त्या दासीने पेत्राला विचारले, “तू खात्रीने या माणसाच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?”
त्याने उत्तर दिले, “मी नाही.”
थंडी पडल्यामुळे शिपाई व वाड्यातील दास ऊब मिळावी म्हणून शेकोटी पेटवून त्याच्याभोवती शेकत उभे राहिले. पेत्रसुद्धा त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला.