बेथानी हे गाव यरुशलेमपासून दोन मैलापेक्षा कमी अंतरावर होते. आणि अनेक यहूदी लोक मार्था व मरीया यांच्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. येशू येत आहेत हे ऐकताच, मार्था त्यांना भेटावयास सामोरी गेली, पण मरीया मात्र घरातच राहिली.
“प्रभूजी,” मार्था येशूंना म्हणाली, “आपण येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता. परंतु तरी आता जे काही आपण परमेश्वराजवळ मागाल, ते आपणास ते देतील हे मला ठाऊक आहे.”
त्यावर येशूंनी तिला सांगितले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
मार्था म्हणाली, “होय, अंतिम दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी तो जिवंत होईल.”
येशू तिला म्हणाले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी मजवर विश्वास ठेवतो, तो मरण पावला असला, तरी पुन्हा जगेल; जो कोणी मजवर विश्वास ठेवून जगतो तो कधीही मरणार नाही. यावर तुझा विश्वास आहे काय?”
“होय, प्रभूजी,” ती म्हणाली, “या जगात येणारा, तो ख्रिस्त (मसिहा), परमेश्वराचे पुत्र आपण आहात यावर माझा विश्वास आहे.”
ती असे बोलल्यानंतर परत गेली व आपली बहीण मरीयेला बाजूला बोलावून म्हणाली, “गुरुजी आले आहेत आणि ते तुला विचारत आहेत.” मरीयेने हे ऐकले तेव्हा ती त्वरेने उठून त्यांच्याकडे गेली. येशूंनी अद्याप गावात प्रवेश केलेला नव्हता, जिथे मार्था त्यांना भेटली त्याच ठिकाणी ते होते. जे यहूदी लोक मरीयेच्याजवळ घरात होते व तिचे सांत्वन करीत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले, तेव्हा ती शोक करण्यासाठी कबरेकडेच जात आहे असे त्यांना वाटले आणि म्हणून तेही तिच्या पाठीमागे गेले.
येशू जिथे होते तिथे मरीया पोहोचल्यावर त्यांना पाहून ती त्यांच्या पाया पडली व त्यांना म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता.”
येशूंनी तिला असे रडताना आणि जे यहूदी तिच्याबरोबर होते त्यांना शोक करताना पाहिले, तेव्हा ते आत्म्यामध्ये व्याकूळ व अस्वस्थ झाले. येशूंनी विचारले, “तुम्ही त्याला कुठे ठेवले आहे?”
ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, या आणि पाहा.”
येशू रडले.
नंतर यहूदी म्हणाले, “पाहा, त्यांचे त्याच्यावर किती प्रेम होते!”
परंतु काहीजण म्हणाले, “ज्याने आंधळ्या मनुष्याचे डोळे उघडले, ते या मनुष्याला मरणापासून वाचवू शकले नाहीत का?”
येशू पुन्हा व्याकूळ होऊन कबरेजवळ आले. ती एक गुहा होती आणि तिच्या प्रवेशद्वारावर धोंड लोटलेली होती. येशू म्हणाले, “धोंड बाजूला काढा.”
मृत माणसाची बहीण मार्था म्हणाली, “परंतु प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी सुटली असेल, कारण त्याला तिथे ठेऊन चार दिवस झाले आहेत.”
तेव्हा येशू म्हणाले, “मी तुला सांगितले नव्हते काय, की जर तू विश्वास ठेवशील तर परमेश्वराचे गौरव पाहशील?”
यास्तव त्यांनी ती धोंड बाजूला केली. मग येशूंनी दृष्टी वर करून म्हटले, “हे पित्या, तुम्ही माझे ऐकले म्हणून मी तुमचे आभार मानतो. मला माहीत आहे की तुम्ही नेहमीच माझे ऐकता, परंतु सर्व लोक जे येथे उभे आहेत, त्यांच्या हिताकरिता मी हे बोललो, यासाठी की तुम्ही मला पाठविले आहे यावर त्यांनी विश्वास ठेवावा.”
हे बोलल्यावर, येशू मोठ्याने हाक मारून म्हणाले, “लाजरा, बाहेर ये!” लाजर बाहेर आला, त्याचे हातपाय पट्ट्यांनी बांधलेले होते व तोंडाभोवती कापड गुंडाळलेले होते.
येशूंनी लोकांस म्हटले, “त्याची प्रेतवस्त्रे काढा आणि त्याला जाऊ द्या.”
यामुळे मरीयेला भेटावयास आलेल्या अनेक यहूद्यांनी येशूंनी जे केले ते पाहिले व त्याजवर विश्वास ठेवला. परंतु काहीजण परूश्यांकडे गेले आणि येशूंनी काय केले ते त्यांना सांगितले.