यिर्मयाह 42
42
1मग सर्व सैन्यप्रमुख म्हणजे कारेहाचा पुत्र योहानान, होशयाहचा पुत्र यजन्याह#42:1 किंवा असारिया, व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोक 2यिर्मयाह संदेष्ट्याकडे आले आणि त्याला म्हणाले, “आम्ही सर्व उरलेल्या लोकांसाठी याहवेह, तुझे परमेश्वर यांची प्रार्थना कर. कारण आम्ही पूर्वी पुष्कळ होतो, आता फारच थोडे उरलो आहोत, हे तू पाहतोस. 3आम्ही काय करावे, कुठे जावे हे आम्हाला दाखवावे, म्हणून याहवेह, तुझ्या परमेश्वराला विनवणी कर.”
4यिर्मयाह संदेष्ट्याने उत्तर दिले, “मी तुमचे ऐकले आहे, मी निश्चितच याहवेह, तुमचे परमेश्वर यांच्याकडे तुमच्या विनवणीप्रमाणे प्रार्थना करतो; आणि ते काय म्हणतात ते तुम्हाला मी सांगतो, मी तुमच्यापासून काही लपविणार नाही.”
5त्यावर ते यिर्मयाहला म्हणाले, “आम्हाला याहवेह जे करावयास सांगतील, ते आम्ही करण्याचे नाकारले, तर याहवेह आमचे परमेश्वर आमच्याविरुद्ध सत्य व विश्वसनीय साक्षीदार असतील. 6त्यांचा संदेश आम्हाला अनुकूल असो वा प्रतिकूल, आम्ही आमच्या याहवेहच्या आज्ञा पाळू, आम्ही तुला ज्यांच्याकडे विनंती करण्यास पाठवित आहोत, त्या आमच्या परमेश्वर याहवेहचे आम्ही ऐकू.”
7दहा दिवसांनी यिर्मयाहला याहवेहचे वचन आले. 8तेव्हा त्याने कारेहाचा पुत्र योहानान, त्याच्याबरोबर असलेले सर्व सेनाप्रमुख व सर्व लहान थोर लोक यांना एकत्र बोलाविले. 9तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपली विनंती सादर करण्यासाठी मला याहवेह, इस्राएलाच्या परमेश्वराकडे पाठविले, ते असे म्हणतात: 10‘तुम्ही जर याच देशात राहिलात तर मी तुम्हाला उभारेन आणि तुम्हाला उद्ध्वस्त करणार नाही; मी तुम्हाला रोपीन, आणि उपटून टाकणार नाही, कारण तुमच्यावर अरिष्ट आणल्याचा मला अनुताप होत आहे. 11आता ज्याला तुम्ही घाबरता त्या बाबेलच्या राजाचे मुळीच भय बाळगू नका. त्याला भयभीत होऊ नका, याहवेह असे जाहीर करतात, कारण मी तुम्हासह असेन व तुम्हाला त्याच्या हातातून सोडवेन. 12त्याने तुमच्यावर दया करावी व तुम्हाला तुमच्या भूमीवर परत पुनर्वसित करावे म्हणून मी तुमच्यावर दया करेन.’
13“परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा धिक्कारून म्हणाल, ‘आम्ही येथे राहणार नाही, 14आणि आम्ही इजिप्तमध्ये जाऊन राहू, जिथे आम्हाला लढाई, रणशिंगे ऐकू येणार नाहीत किंवा अन्नाची भूक यापासून सुटका मिळेल,’ 15तर तुम्हाला याहवेहचे हे वचन मिळत आहे, हे यहूदीयाच्या अवशेषा, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘जर तुम्ही इजिप्तमध्ये जाण्याचा व तिथेच राहण्याचा हट्ट कराल, 16तर ज्या लढाईच्या व दुष्काळाच्या आपत्तींना तुम्ही घाबरता, त्या तुमच्या मागोमाग इजिप्तमध्ये येतील व तुम्ही तिथे नाश पावाल. 17तुमच्यापैकी इजिप्तमध्ये जाऊन राहण्याचा आग्रह धरणार्या प्रत्येकाची हीच गत होईल. होय, तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल तिथे मी तुमच्यावर जी संकटे आणेन त्यातून तुमच्यापैकी एकही वाचणार नाही.’ 18कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: ‘यरुशलेमच्या लोकांवर माझ्या रागाचा व क्रोधाचा वर्षाव झाला, तसाच तुम्ही इजिप्तमध्ये प्रवेश कराल तेव्हा तुमच्यावर होईल. तिथे तुम्ही घृणा, शाप व उपहासाचा विषय व्हाल; तुम्हाला हा देश परत कधी दिसणार नाही.’
19“कारण याहवेहने तुम्हाला म्हटले आहे. ‘अहो यहूदीयातील अवशिष्ट लोकांनो, इजिप्तमध्ये जाऊ नका! आज मी तुम्हाला इशारा दिला आहे, तो कधी विसरू नका. 20तुम्ही ही भयानक चूक केली आहे, तुम्हीच मला याहवेह, तुमच्या परमेश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी पाठविले होते व सांगितले की आमच्या याहवेह परमेश्वराकडे प्रार्थना करून ते काय म्हणतात ते सर्व आम्हाला सांग, म्हणजे आम्ही त्याप्रमाणे करू.’ 21याहवेह तुमचे परमेश्वर यांनी जे सांगण्यास मला तुमच्याकडे पाठविले, ते मी तुम्हाला आज सांगितले, परंतु तुम्ही ते अद्यापि पाळले नाही. 22म्हणून आता तुम्ही हे निश्चित समजा: जिथे जाऊन वसती करण्याची तुमची इच्छा आहे, तिथे तुम्ही तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडाल.”
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 42: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.