यिर्मयाह 41
41
1परंतु सातव्या महिन्यात एलीशामाचा पुत्र नथन्याह याचा पुत्र, इश्माएल, जो राजघराण्यातील व राजाच्या उच्चाधिकार्यांपैकी एक होता. हा आपल्याबरोबर दहा माणसे घेऊन मिस्पाह येथे अहीकामचा पुत्र गदल्याहस भेटण्यासाठी आला. ते सर्व भोजन करीत असताना, 2नथन्याहचा पुत्र इश्माएल व त्याच्या सोबतीची दहा माणसे एकाएकी उठली. त्यांनी तलवारी उपसल्या व ज्याची बाबेलच्या राजाने राज्यपाल म्हणून नेमणूक केली होती, तो शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याहस, ठार मारले. 3नंतर त्याने गदल्याह बरोबर मिस्पाह येथे असलेले यहूदीयातील अधिकारी व बाबिलोनचे सैनिक यांचीही इश्माएलाने कत्तल केली.
4गदल्याहाच्या खुनाच्या दुसर्या दिवशी, कोणालाही हे समजण्यापूर्वी, 5याहवेहच्या मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी शेखेम, शिलोह व शोमरोनात येथून ऐंशी माणसे मिस्पाहच्या रोखाने आली. त्यांच्या दाढ्या काढल्या होत्या. त्यांनी आपले कपडे फाडले होते, तसेच त्यांनी स्वतःला जखमा करून घेतल्या होत्या; त्यांनी बरोबर अर्पणे व ऊद आणली होती. 6नथन्याहचा पुत्र इश्माएल रडत त्यांना भेटण्यासाठी मिस्पाह शहरातून निघाला व म्हणाला “चला! आपण अहीकामचा पुत्र गदल्याहची भेट घेऊ.” 7मग ते सर्वजण शहराच्या आत आल्यावर, नथन्याहचा पुत्र इश्माएल व त्याची माणसे यांनी त्यांच्यापैकी दहा जणांना सोडून बाकी सर्वांना जिवे मारले व त्यांची प्रेते एका विहिरीत टाकली. 8त्यापैकी दहाजणांनी इश्माएलशी बोलणे केले, “तू आम्हाला ठार मारू नको! आम्ही गहू, जव, तेल व मध यांचे मोठे साठे एका शेतात लपवून ठेवले आहेत.” म्हणून त्याने इतरांसह त्यांचा वध न करता त्यांना सोडून दिले. 9वध केलेल्या लोकांचे व गदल्याहचे प्रेत नथन्याहचा पुत्र इश्माएलने ज्या विहिरीत टाकले होते, ती भली मोठी विहीर, इस्राएलचा राजा बाशा, याच्यापासून आपले संरक्षण करण्याकरिता आसा राजाने बांधली होती. नथन्याहचा पुत्र इश्माएलने ती विहीर प्रेतांनी भरून टाकली.
10नथन्याहचा पुत्र इश्माएलने पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याने मिस्पाहमध्ये अहीकामचा पुत्र गदल्याहच्या स्वाधीन केलेल्या लोकांना व राजकन्यांना आणि उरलेल्या सर्वांनाही ताब्यात घेतले. सर्व कैद्यांना त्याने बरोबर घेऊन तो पलीकडील अम्मोनी लोकांकडे चालू लागला.
11परंतु कारेहपुत्र योहानान व इतर सर्व सेना प्रमुखांनी नथन्याहचा पुत्र इश्माएलने केलेल्या गुन्ह्याबद्दल ऐकले, 12तेव्हा त्यांनी आपले सर्व लोक गोळा केले आणि नथन्याहचा पुत्र इश्माएलशी युद्ध करण्यास ते निघाले. गिबोनजवळच्या महाकुंडापाशी त्यांनी त्याला गाठले. 13इश्माएल बरोबरच्या लोकांनी कारेहचा पुत्र योहानान व त्याच्यासोबत असलेल्या सरदारांना पाहताच आनंदाने जयघोष केला. 14इश्माएलने मिस्पाह येथे बंदिवान म्हणून नेलेले सर्व लोक वळले व कारेहपुत्र योहानानला जाऊन मिळाले. 15परंतु नथन्याहचा पुत्र इश्माएल, योहानानपासून सुटून त्याच्या आठ माणसांसह अम्मोन्यांकडे पळून गेला.
इजिप्तला पलायन
16मग कारेहापुत्र योहानान व त्याच्यासोबत असलेल्या सेनाधिकाऱ्यांनी अहीकामचा पुत्र गदल्याहचा नथन्याहचा पुत्र इश्माएलने वध केल्यानंतर मिस्पाह इथे उरलेल्या लोकांना—सैनिक, स्त्रिया, मुले व गिबोन येथून सोडविलेले राजदरबारातील अधिकारी यांना घेऊन ते निघाले. 17इजिप्त येथे जाण्याच्या उद्देशाने ते बेथलेहेम नजीकच्या गेरूथ किमहाम या गावी गेले. 18त्यांना बाबिलोनच्या लोकांचे भय वाटू लागले व ते त्यांना चुकविण्याचा प्रयत्न करू लागले, कारण नथन्याहचा पुत्र इश्माएलने बाबिलोनच्या राजाने देशाचा राज्यपाल म्हणून नियुक्त केलेल्या अहीकामचा पुत्र गदल्याहचा वध केला होता.
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 41: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.