यिर्मयाह 40
40
यिर्मयाहची सुटका
1पहारेकऱ्यांचा नायक नबुजरदान याला, बाबिलोन येथे बंदिवासात यरुशलेम व यहूदीया येथील जे लोक पाठविले जाणार होते, त्यांच्याबरोबर यिर्मयाह साखळदंडात बांधलेला आढळला. तेव्हा त्याने त्याला रामाह येथे नेले, त्याची सुटका केली. यानंतर यिर्मयाहला याहवेहचे वचन आले. 2पहारेकऱ्यांच्या नायकाला जेव्हा यिर्मयाह सापडला, तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, “तुझे परमेश्वर याहवेहने या देशावर हे सर्व अरिष्ट आणण्याचा निवाडा केला होता. 3आणि जसे त्यांनी पूर्वी सांगितलेच होते, आता तसा हा अनर्थ ओढवला आहे; हे सर्व यामुळे घडले, कारण या लोकांनी याहवेहची आज्ञा न पाळता त्यांच्याविरुद्ध पाप केले. 4आज मी तुझ्या हातातील बेड्या काढून तुला मोकळे करतो. माझ्याबरोबर बाबेलला यावे अशी तुझी इच्छा असेल तर चल. मी तुझा सांभाळ करेन; पण तिकडे यावे असे तुला वाटत नसेल, तर येऊ नकोस. संपूर्ण देश तुझ्यासमोर आहे, तुझ्या मनात येईल तिकडे जा.” 5यिर्मयाह वळून त्याच्यापुढून जाण्याआधी नबुजरदान म्हणाला, “शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याच्याकडे परत जा. त्याला बाबेलच्या राजाने यहूदीया प्रांतातील नगरांवर राज्यपाल नेमले आहे. त्याच्यासह या लोकांबरोबर राहा किंवा तुझ्या मर्जीप्रमाणे तुला पाहिजे तिकडे जा.”
नंतर नबुजरदानने त्याला शिदोरी व भेट दिली व त्याला सोडून दिले. 6तेव्हा यिर्मयाह मिस्पाह येथे अहीकामचा पुत्र गदल्याहकडे गेला व देशातील उरलेल्या लोकांमध्ये राहिला.
गदल्याहचा वध
7अजूनही मोकळ्या मैदानात असणारे सर्व सेनेचे अधिकारी आणि त्यांच्या माणसांनी ऐकले की बाबेलच्या राजाने अहीकामचा पुत्र गदल्याहची देशाचा राज्यपाल म्हणून नेमणूक केली आहे, आणि अत्यंत गरीब असे पुरुष, स्त्रिया व लेकरे व ज्यांना बाबेलास बंदिवासात नेले नाही अशांवर अधिकारी केले आहे. राज्यपाल म्हणून गदल्याहचा पुत्र अहीकामची नेमणूक केली आहे, 8तेव्हा ते म्हणजे नथन्याहचा पुत्र इश्माएल, कोरहाचे पुत्र योहानान व योनाथान, तन्हुमेथचा पुत्र सेरायाह, नटोफाथी एफै याचे पुत्र, व माकाथी यजन्याह व त्यांचे लोक गदल्याहकडे मिस्पाह येथे आले. 9शाफानचा पुत्र अहीकाम याचा पुत्र गदल्याह याने त्यांना व त्यांच्या लोकांना पुनः खात्री देण्यासाठी शपथ घेतली. तो म्हणाला, “खास्द्यांच्या अधिकार्यांची सेवा करण्यास भिऊ नका, देशात स्थायिक व्हा आणि बाबेलच्या राजाची सेवा करा, आणि तुमचे बरे होईल. 10मी स्वतः मिस्पाह येथे राहीन. माझ्या कारभाराची पाहणी करावयास बाबिलोनचे अधिकारी येतील, तेव्हा त्यांच्याकडे मी तुमच्यासाठी मध्यस्थी करेन. द्राक्षांचे पीक गोळा करा, उन्हाळी फळे व जैतुनाची फळे गोळा करा व ती साठवून ठेवा. तुमच्या मनाला येईल त्या शहरात राहा.”
11यहूदीया प्रांतामध्ये अजून काही लोक उरले आहेत, बाबेलच्या राजाने सर्वांनाच कैद करून नेले नाही व शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याह हा राज्यपाल म्हणून नियुक्त झाला आहे, असे मोआब, अम्मोन, एदोम, या प्रांतात व आजूबाजूच्या देशात असलेल्या यहूद्यांनी ऐकले, तेव्हा 12तेही जिथे विखरून गेले होते, तिथून यहूदीया प्रांतात मिस्पाह येथे गदल्याहकडे आले. नंतर त्यांनी द्राक्षारस आणि उन्हाळी फळे या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले.
13कारेहपुत्र योहानान व मोकळ्या रानातील सैनिकांचे प्रमुख मिस्पाह येथे गदल्याहकडे आले, 14व तो गदल्याहला सतर्क करून म्हणाला, “अम्मोनी लोकांचा राजा बालीस, याने नथन्याहचा पुत्र इश्माएल, याला तुझा वध करण्यास पाठविले आहे, हे तुला माहीत नाही काय?” परंतु अहीकामचा पुत्र गदल्याहने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
15नंतर कारेहाचा पुत्र योहानानने मिस्पाह येथे गदल्याहशी गुप्तपणे चर्चा केली व त्याला म्हटले, “मी नथन्याहचा पुत्र इश्माएलचा वध करतो, कोणालाही कळणार नाही. त्याला तुमचा वध का करू द्यावा, जे यहूदी गोळा होऊन तुझ्याकडे परतले आहेत, त्यांची पांगापांग होऊन उरलेल्या यहूदीयाचा नाश का होऊ द्यावा?”
16परंतु अहीकामचा पुत्र गदल्याह कारेहाचा पुत्र योहानानला म्हणाला, “अशी कोणतीही गोष्ट तू करू नये! कारण तू इश्माएलबद्दल खोटे सांगत आहेस.”
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 40: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.