यिर्मयाह 39
39
1यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला व त्याभोवती वेढा घातला. 2आणि सिद्कीयाह राजाच्या राजवटीच्या अकराव्या वर्षी, चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी त्यांनी नगराच्या तटाला खिंड पाडली. 3बाबिलोनच्या सैन्यातील सर्व अधिकारी—सामगरचा नेरगल-शरेसर उच्चाधिकारी, प्रमुख अधिकारी नेबो-सर्सखीम, उच्चाधिकारी नेर्गल-शरेसर व बाबिलोनच्या राजाचे इतर सर्व अधिकाऱ्यांनी आत प्रवेश केला व ते मधल्या वेशीत येऊन बसले. 4हे पाहताच यहूदीयाचा राजा सिद्कीयाह व त्याचे सैनिक रात्रीच्या वेळी शहर सोडले, त्यांनी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून अराबाहच्या#39:4 किंवा यार्देनचे खोरे दिशेने पळून गेले.
5परंतु बाबेलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला व सिद्कीयाहला यरीहोच्या मैदानात पकडले व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याकडे हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली. 6बाबेलचा राजाने रिब्लाहात सिद्कीयाहच्या डोळ्यादेखत त्याच्या मुलांचा वध केला व यहूदीयाचे सर्व प्रतिष्ठित लोक यांचाही वध केला. 7मग त्याने सिद्कीयाहचे डोळे उपटून काढले आणि त्याला बाबेलास बंदिवान म्हणून पाठविण्यासाठी कास्याच्या साखळ्यांनी बांधले.
8बाबेलच्या सैन्याने राजवाडा आणि लोकांची घरे जाळली आणि यरुशलेमचे तट पाडून टाकले. 9मग गारद्यांचा सरदार नबुजरदान याने शहरात उरलेल्यांना, त्यांना पूर्वीच फितूर झालेल्या सर्वांना व शेष लोकांना बाबेलला बंदिवासात घेऊन गेला. 10परंतु सर्व यहूदाह प्रांतात त्याने अगदी गरीब असलेल्या लोकांना, ज्यांच्याकडे काहीही नव्हते त्यांना नबुजरदानने तिथेच राहू दिले व त्यांना शेते आणि द्राक्षमळे दिले.
11आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने गारद्यांचा सरदार नबुजरदानला यिर्मयाहविषयी अशी आज्ञा दिली: 12“त्याला ताब्यात घेऊन त्याची नीट काळजी घ्या; त्याला काही इजा होऊ देऊ नका व तो मागेल ते त्याला द्या,” 13त्याप्रमाणे गारद्यांचा सरदार नबुजरदान, खोजांचा प्रमुख नबूशजबान व राजाचा सल्लागार नेरगल-शरेसर व बाबिलोनचे इतर उच्चाधिकारी यांनी 14सैनिक पाठवून यिर्मयाहला पहारेकऱ्यांच्या आंगणातून बाहेर आणले व त्याला परत त्याच्या घरी नेण्यासाठी शाफानचा नातू व अहीकामचा पुत्र गदल्याह याच्याकडे सोपविले. मग यिर्मयाह देशामध्ये उरलेल्या त्याच्या लोकांमध्ये राहिला.
15यिर्मयाह पहारेकऱ्यांच्या आंगणातच असताना त्याला याहवेहचे वचन आले: 16“जा आणि कूशी एबेद-मेलेखला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी या शहराविरुद्ध दिलेली माझी वचने पूर्ण करण्याची वेळ आली आहे—समृद्धी नव्हे तर विध्वंस. तुझ्या डोळ्यादेखत मी ते पूर्ण करेन. 17परंतु त्या दिवशी तुझी मात्र मी सुटका करेन, असे याहवेह जाहीर करतात; ज्यांची तुला भीती वाटते, त्यांच्या हातात तुला देणार नाही. 18मी तुला वाचवेन; तलवारीने तुझा वध होणार नाही, पण मी तुझा जीव वाचवेन, कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे याहवेह जाहीर करतात.’ ”
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 39: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.