YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 39:11-18

यिर्मयाह 39:11-18 MRCV

आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने गारद्यांचा सरदार नबुजरदानला यिर्मयाहविषयी अशी आज्ञा दिली: “त्याला ताब्यात घेऊन त्याची नीट काळजी घ्या; त्याला काही इजा होऊ देऊ नका व तो मागेल ते त्याला द्या,” त्याप्रमाणे गारद्यांचा सरदार नबुजरदान, खोजांचा प्रमुख नबूशजबान व राजाचा सल्लागार नेरगल-शरेसर व बाबिलोनचे इतर उच्चाधिकारी यांनी सैनिक पाठवून यिर्मयाहला पहारेकऱ्यांच्या आंगणातून बाहेर आणले व त्याला परत त्याच्या घरी नेण्यासाठी शाफानचा नातू व अहीकामचा पुत्र गदल्याह याच्याकडे सोपविले. मग यिर्मयाह देशामध्ये उरलेल्या त्याच्या लोकांमध्ये राहिला. यिर्मयाह पहारेकऱ्यांच्या आंगणातच असताना त्याला याहवेहचे वचन आले: “जा आणि कूशी एबेद-मेलेखला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी या शहराविरुद्ध दिलेली माझी वचने पूर्ण करण्याची वेळ आली आहे—समृद्धी नव्हे तर विध्वंस. तुझ्या डोळ्यादेखत मी ते पूर्ण करेन. परंतु त्या दिवशी तुझी मात्र मी सुटका करेन, असे याहवेह जाहीर करतात; ज्यांची तुला भीती वाटते, त्यांच्या हातात तुला देणार नाही. मी तुला वाचवेन; तलवारीने तुझा वध होणार नाही, पण मी तुझा जीव वाचवेन, कारण तू माझ्यावर भिस्त ठेवलीस, असे याहवेह जाहीर करतात.’ ”

यिर्मयाह 39 वाचा