यिर्मयाह 38
38
यिर्मयाहला शुष्क विहिरीत फेकण्यात येते
1परंतु यिर्मयाह लोकांना काय सांगत आहे हे मत्तानचा पुत्र शफाट्याह, पशहूरचा पुत्र गदल्याह, शेलेम्याहचा पुत्र युकाल#38:1 किंवा येहूकाल व मल्कीयाहचा पुत्र पशहूर यांनी ऐकले. 2यिर्मयाह सांगत होता, “याहवेह असे म्हणतात: ‘यरुशलेम नगरीमध्ये जे कोणी राहतील ते सर्व तलवार, दुष्काळ व मरी यांना बळी पडतील. पण जे बाबिलोनचे सेनेला शरण जातील ते जगतील. त्यांचा जीव वाचेल; ते जगतील.’ 3आणि याहवेह असे म्हणतात: ‘हे शहर निश्चितच बाबिलोनचे राजाच्या सेनेच्या हाती देण्यात येईल, तो ते हस्तगत करेल.’ ”
4मग हे ऐकताच अधिकारी राजाकडे गेले व म्हणाले, “महाराज, या मनुष्याला जिवे मारलेच पाहिजे. कारण याच्या बोलण्याने नगरात आपल्या उरलेल्या सैनिकांचे आणि जनतेचेही मनोधैर्य खचत आहे, हा या लोकांच्या कल्याणाचे बोलत नाही, तर त्यांच्या नाशाबद्दल बोलतो.”
5यावर सिद्कीयाह राजा म्हणाला, “तो तुमच्या हातात आहे. राजा तुमच्या विरोधात काही करू शकत नाही.”
6मग त्यांनी यिर्मयाहला बाहेर काढले व त्याला दोरांच्या साहाय्याने राजपुत्र मल्कीयाह याच्या राजवाड्याच्या आवारातील एका अंधार विहिरीत सोडले; त्यात पाणी नव्हते, पण तळाशी खूप गाळ होता आणि यिर्मयाह त्या गाळात रुतला.
7यिर्मयाहला राजवाड्यातील अंधार विहिरीत टाकले आहे, हे वृत्त यरुशलेमच्या राजवाड्यातील एबेद-मेलेख नावाच्या एका प्रमुख अधिकार्याने ऐकले. तो कूशी देशाचा मूळ रहिवासी होता. यावेळी राजा बिन्यामीन वेशीपाशी बसला होता. 8एबेद-मेलेख लागलीच राजवाड्याच्या बाहेर गेला व राजाला म्हणाला, 9“महाराज, माझे स्वामी, या माणसांनी यिर्मयाह संदेष्ट्याला अंधार विहिरीत टाकले, हे फार वाईट कृत्य केले आहे. तिथे तो उपासमारीने मरेल, कारण शहरातील सर्व भाकर संपली आहे.”
10मग राजाने कूशी एबेद-मेलेखला सांगितले, “तू तीस माणसे घेऊन जा आणि यिर्मयाह संदेष्टा मरण्याआधीच त्याला त्या अंधार विहिरीतून बाहेर काढ.”
11तेव्हा इथिओपी एबेद-मेलेखने माणसे घेतली आणि तो राजवाड्यातील एका कोठारात गेला. तिथे टाकून दिलेल्या वस्तू व जुने कपडे ठेवलेले होते. तिथून काही चिंध्या व जुने कपडे घेऊन तो अंधार विहिरीकडे गेला व दोरीला बांधून ते बोचके त्याने खाली यिर्मयाहकडे विहिरीत सोडले. 12कूशी एबेद-मेलेखने यिर्मयाहला सांगितले, “तुला दोर्या काचू नयेत म्हणून या चिंध्या आपल्या बगलेत ठेव.” यिर्मयाहने त्याप्रमाणे केल्यावर 13यिर्मयाहला त्यांनी ओढून अंधार विहिरीतून बाहेर काढले व परत राजवाड्यातील अंगणात आणले व तिथे तो राहिला.
सिद्कीयाह यिर्मयाहचा सल्ला घेतो
14एके दिवशी सिद्कीयाह राजाने निरोप पाठविला की यिर्मयाह संदेष्ट्याला याहवेहच्या मंदिराच्या बाजूच्या देवडीत घेऊन यावे. राजा यिर्मयाहला म्हणाला, “मी तुला काही विचारणार आहे. तर खरे तेच सांग. मजपासून काहीही लपविण्याचा प्रयत्न करू नकोस.”
15त्यावर यिर्मयाह सिद्कीयाह राजा म्हणाला, “मी तुम्हाला उत्तर दिले, तर तुम्ही मला ठार करणार नाही का? आणि मी तुम्हाला काही सल्ला जरी दिला तरी तुम्ही माझे ऐकणार नाहीच.”
16तेव्हा सिद्कीयाह राजाने यिर्मयाहला त्याचे उत्पन्नकर्ता, सर्वसमर्थ याहवेह, यांची गुप्तपणे शपथ वाहिली: “मी तुला ठार मारणार नाही किंवा तुझा जीव घेऊ पाहणार्यांच्या हाती तुला देणार नाही.”
17मग यिर्मयाह सिद्कीयाहला म्हणाला, “सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: तुम्ही बाबेलच्या राजाला शरण गेलात तर तुमचा जीव वाचेल आणि हे शहर जाळण्यात येणार नाही; तुम्ही व तुमचे घराणे जगेल. 18परंतु तुम्ही बाबेलच्या राजाच्या अधिकाऱ्यांना शरण जाण्याचे नाकारलेस, तर हे शहर बाबेल्यांच्या हाती देण्यात येईल आणि ते या शहराला आग लावील आणि तुम्हीही त्यांच्या हातून सुटणार नाहीस.”
19यावर राजा सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “मला पुढे बाबेलला गेलेल्या यहूद्यांची भीती वाटते, कारण बाबिलोनचे लोक मला यहूद्यांच्या हाती देतील व ते माझे हाल करतील.”
20यिर्मयाहने उत्तर दिले, “ते तुम्हाला त्यांच्या हवाली करणार नाही. तुम्ही याहवेहच्या आज्ञा पाळा व मी काय सांगतो ते करा. तर ते तुम्हाला हितकारक ठरेल आणि तुमचा जीव वाचेल. 21मात्र आत्मसमर्पण करण्याचे नाकारले, तर याहवेहने मला हे प्रगट केले आहे: 22तुमच्या यहूदीयाच्या राजाच्या राजवाड्यात उरलेल्या सर्व स्त्रियांना बाहेर आणून बाबिलोनच्या सरदारांच्या स्वाधीन केले जाईल, तेव्हा त्या स्त्रिया तुम्हाला म्हणतील:
“ ‘त्यांनी तुला चुकीच्या मार्गावर नेले व तुझ्यावर मात केली—
ते तुझे विश्वसनीय मित्र.
तुझी पावले आता गाळात रुतली आहेत;
त्यांनी टाकून दिले आहे.’
23“तुमच्या सर्व स्त्रिया व मुले यांना बाबिलोनच्या लोकांच्या हवाली केले जाईल, आणि तुम्हीही त्यांच्या हातून सुटणार नाही. बाबिलोनचा राजा तुम्हाला पकडेल आणि हे शहर#38:23 तुझ्यामुळे जळून खाक होईल.”
24मग सिद्कीयाह यिर्मयाहला म्हणाला, “या चर्चेबद्दल कोणाला काही कळू देऊ नकोस, नाहीतर तुझा वध होईल. 25मी तुझ्याशी बोललो, हे माझ्या अधिकार्यांना कळले, व ‘आम्हाला सांग, राजाला तू काय सांगितले व राजाने तुला काय सांगितले; काहीही लपवू नकोस नाहीतर, आम्ही तुला ठार करतो,’ अशी त्यांनी तुला धमकी दिली, 26तर त्यांना एवढेच सांग, ‘योनाथानच्या घरच्या अंधारकोठडीत मला पुन्हा पाठवू नका, नाहीतर तिथे मी मरेन, एवढीच विनवणी मी राजाला केली.’ ”
27सर्व नगराधिकारी यिर्मयाहकडे आले व त्याला प्रश्न विचारू लागले. तेव्हा राजाने आज्ञापिल्याप्रमाणे यिर्मयाहने त्यांना सांगितले. मग त्यांनी त्याला काहीही विचारले नाही व राजाशी त्याचा झालेला संवाद कोणीही ऐकला नव्हता.
28आणि बाबिलोनच्या लोकांनी यरुशलेम पुन्हा जिंकून घेईपर्यंत, यिर्मयाह राजवाड्यातील अंगणात राहिला.
यरुशलेमचे पतन
यरुशलेमचा अशाप्रकारे पाडाव झाला.
सध्या निवडलेले:
यिर्मयाह 38: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.