YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 32

32
यिर्मयाह एक शेत विकत घेतो
1यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या राजवटीच्या दहाव्या वर्षी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, याहवेहकडून यिर्मयाहला पुढील वचन प्राप्त झाले: 2यावेळी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातलेला होता, व यिर्मयाह संदेष्टा यहूदीयाच्या राजवाड्याच्या तळघरातील कोठडीत कैदेत होता.
3यहूदीयाचा राजा सिद्कीयाहने यिर्मयाहला कैदेत टाकले, असे म्हणून, “तू असा संदेश का देतोस? तू म्हणतोस याहवेह असे म्हणतात: ‘मी आता बाबेलच्या राजाच्या हातात हे नगर देणार आहे, आणि तो ते हस्तगत करणार आहे. 4यहूदीयाचा राजा सिद्कीयाहची खास्द्यांच्या#32:4 खाल्डियन हातून सुटका होणार नाही, पण तो निश्चितच बाबेलच्या राजाच्या हातात पडेल व त्याच्याशी तो समोरासमोर बोलेल आणि सर्व स्वतःच्या डोळ्याने बघेल. 5तो राजा सिद्कीयाहला खास्द्यांच्या येथे नेईल व मी येऊन तुझी भेट घेईपर्यंत तो तिथेच राहील, असे याहवेह जाहीर करतात. जर तू बाबेलांशी युद्ध केलेस तरी तुला विजय मिळणार नाही.’ ”
6यिर्मयाह म्हणाला, याहवेहकडून मला हे वचन आले आहे: 7शल्लूमचा पुत्र हानामेल, तुझा चुलतभाऊ, लवकरच येऊन तुला भेटेल व म्हणेल, ‘अनाथोथ येथील माझे शेत तू विकत घे, कारण तू माझा सर्वात जवळचा नातेवाईक म्हणून ते विकत घेण्याचे तुझे कर्तव्य आहे.’
8“याहवेहने म्हटल्याप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल आला व त्याने तुरुंगात माझी भेट घेतली. तो मला म्हणाला, ‘बिन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथील माझे शेत विकत घे, कारण कायद्याप्रमाणे ते सोडवून त्याची मालकी घेण्याचा प्रथम हक्क तुझा आहे, म्हणून ते तुझ्यासाठी तू विकत घे.’
“तत्काळ माझी खात्री झाली की हा संदेश खरोखर याहवेहकडून आला होता; 9मग मी माझा चुलतभाऊ हानामेलला सतरा शेकेल#32:9 अंदाजे 200 ग्रॅ. चांदी देऊन अनाथोथ येथील ते शेत विकत घेतले. 10साक्षीदारांच्या सहीसमेत मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारला व चांदी तोलून त्याला दिली. 11नंतर मी शर्ती व अटी नमूद केलेले—मोहोरबंद केलेले खरेदीखत घेतले, तसेच त्या खतपत्राची मोहोर न केलेली प्रत घेतली— 12आणि सर्वांसमक्ष, माझा चुलतभाऊ हानामेल, खरेदीखतावर सह्या करणारे साक्षीदार त्यांच्या समक्ष व सर्व यहूदी पहारेकऱ्यांच्या चौकात बसले असताना, ती कागदपत्रे बारूख, जो नेरीयाहचा पुत्र, महसेयाहचा नातू, याच्या स्वाधीन केली.
13“सर्व लोक ऐकत असताना मी नेरीयाहचा पुत्र बारूखाला या सूचना दिल्या: 14‘सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मोहोरबंद खरेदीखत व त्याची प्रत ही दोन्हीही घेऊन दीर्घकाळापर्यंत टिकून राहवी म्हणून ती मातीच्या एका पात्रात घालून ठेव. 15कारण सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: पुढे या देशामध्ये पुन्हा घरेदारे, शेते, द्राक्षमळे यांची खरेदी करण्यात येईल.’
16“मग खरेदीखत नेरीयाहचा पुत्र, नेरीयाहचा पुत्र बारूखच्या हवाली केल्यावर मी याहवेहकडे प्रार्थना केली.
17“हे सार्वभौम याहवेह, तुमच्या महान शक्तीने व विस्तारलेल्या भुजेने तुम्ही स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आहे. तुम्हाला अवघड असे काहीच नाही. 18तुम्ही हजारांवर प्रीती करता, परंतु वडिलांच्या पापांसाठी मुलांना शिक्षा होतेच. परमथोर आणि सामर्थ्यवान, ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे. 19तुमच्या योजना महान आहेत व तुमची कार्ये अद्वितीय आहेत. सर्व मानवजातीचे मार्ग तुमच्या नेत्रांना उघड दिसतात; प्रत्येकाला तुम्ही त्याच्या वागणुकीनुसार व कृत्यानुसार योग्य मोबदला देता. 20तुम्ही इजिप्त देशात, इस्राएलमध्ये व सर्व मानवजातीत चिन्हे व चमत्कार केले व आजही करीत आहात, त्यामुळे तुमच्या नावाला आजतागायत महान थोरवी लाभली आहे. 21चिन्ह व चमत्कारांनी आणि सशक्त बाहूंनी व विस्तारलेल्या भुजांनी, तसेच मोठी दहशत बसवून तुम्ही तुमच्या इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले. 22आमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथपूर्वक वचनाप्रमाणे, तुम्ही इस्राएलला दूध व मध वाहता देश दिला. 23ते इथे आले व त्यांनी या देशाचा ताबा घेतला, परंतु तुमचे आज्ञापालन करण्याचे व तुमचे नियम अनुसरण्याचे त्यांनी नाकारले; म्हणूनच तुम्ही त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणले आहे.
24“पाहा, वेढा घालणार्‍यांनी शहराचा ताबा घेण्यासाठी भिंत बांधली आहे. तलवार, दुष्काळ व मरी यांच्यामुळे हे शहर हल्ला करणाऱ्या खास्द्यांच्या हाती पडेल. तुम्ही जे होईल असे म्हटले होते, तेच आता घडतांना तुम्ही बघू शकता. 25सार्वभौम याहवेह, खास्द्यांच्या हाती हे नगर दिले जाणार असूनही तुम्ही मला म्हणता, ‘चांदीची नाणी देऊन शेत विकत घे आणि साक्षीदारांच्या सहीने खरेदीखत तयार कर.’ ”
26नंतर यिर्मयाहला याहवेहचे पुढील वचन आले: 27“मी, याहवेह, अखिल मानवजातीचा परमेश्वर आहे. मला कोणतीही गोष्ट करणे अवघड आहे का? 28म्हणून याहवेह असे म्हणतात: मी हे नगर बाबिलोनचे लोक व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांच्या हाती देणार आहे, जो ते हस्तगत करेल. 29हल्ला करणारे बाबिलोनचे सैनिक आत शिरतील, आणि शहराला आग लावतील. माझा संताप चेतविण्यासाठी ज्या घरांच्या धाब्यावरून बआलमूर्तीस धूप जाळण्यात आला आणि दैवतांना पेयार्पणे वाहण्यात आली, ती सर्व घरे जाळून टाकण्यात येतील.
30“त्यांच्या तारुण्यापासून इस्राएलने व यहूदीयाने माझ्या नजरेत दुष्कर्म करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही; खरोखर, स्वतःच्या हस्तकृतींची उपासना करून माझा क्रोध भडकविण्याशिवाय त्यांनी दुसरे काहीही केले नाही, असे याहवेह जाहीर करतात. 31हे शहर बांधले त्या दिवसापासून आतापर्यंत या शहराने माझा क्रोध व संताप इतका भडकविला आहे की या शहराला मी आपल्या दृष्टीसमोरून काढून टाकणार आहे. 32इस्राएली व यहूदीयाच्या लोकांनी—ते, त्यांचे राजे व अधिकारी, त्यांचे याजक व संदेष्टे, यरुशलेम नगरात व यहूदीयात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या दुष्कर्माने मला अत्यंत संताप आणला आहे. 33त्यांनी माझ्याकडे त्यांचे मुख नव्हे तर पाठ फिरविली आहे; परत परत मी त्यांना शिक्षण दिले, पण त्यांनी माझे ऐकले नाही किंवा माझ्या शिस्तीस प्रतिसाद दिला नाही. 34माझे नाव धारण केलेल्या मंदिरात त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्तीची स्थापना केली व ते भ्रष्ट केले आहे. 35बेन हिन्नोम खोर्‍यांमध्ये त्यांनी बआल दैवतासाठी उंच उंच वेद्या बांधल्या आहेत. तिथे त्यांनी त्यांचे पुत्र व कन्या मोलख मूर्तीस अर्पण केले, हे करण्याचे मी त्यांना कधीही आज्ञापिले नव्हते—असे माझ्या मनातही कधी आले नव्हते—की ते अशी घृणास्पद कृत्ये करतील व यहूदीयास पाप करण्यास लावतील.
36“या नगराबद्धल तुम्ही असे म्हणता, ‘तलवार, दुष्काळ व मरी यामुळे हे शहर बाबेलच्या राजाच्या हाती पडेल, परंतु याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: 37परंतु माझ्या महाक्रोधाने व उग्र कोपाने मी त्यांना ज्या देशात हाकलून दिले, त्या सर्व देशातून मी माझ्या लोकांना एकत्र करेन; मी त्यांना याच ठिकाणी परत आणेन आणि ते सुरक्षितपणे वस्ती करतील. 38मग ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन. 39मी त्यांना एकनिष्ठ अंतःकरण व एकमात्र कार्य देईन, जेणेकरून ते नेहमी माझे भय धरतील आणि त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाबाळांचे सर्वदा कल्याण होईल. 40मी त्यांच्याबरोबर अनंतकाळचा करार करेन: मी त्यांचे कल्याण करणे कधीही थांबविणार नाही, त्यांना माझे भय धरण्यास प्रोत्साहित करेन, जेणेकरून ते माझ्यापासून कधीही विमुख होणार नाहीत. 41त्यांचे कल्याण करण्यात मला आनंद वाटेल व माझ्या पूर्ण मनाने व आत्म्याने मी त्यांना या देशामध्ये पुन्हा स्थापन करेन.
42“याहवेह म्हणतात ते असे: ही सर्व भयंकर संकटे मी या लोकांवर आणली, म्हणून आता मी त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे समृद्धी देईन. 43या देशाबद्दल तुम्ही म्हणत, ‘हा देश उजाड झाला आहे, इथे माणसे आणि पशू यांचा मागमूस राहिलेला नाही, कारण हा बाबिलोनचे लोकांच्या हाती देण्यात आला होता,’ तिथे शेतांची खरेदी पुन्हा सुरू होईल. 44बिन्यामीन प्रांतात, येथे यरुशलेममध्ये, तसेच यहूदीयाच्या शहरात, डोंगराळ प्रदेशातील नगरात, पश्चिमेच्या तळवटीच्या प्रदेशात व नेगेवमध्ये देखील चांदीची नाणी देऊन खरेदीखतांवर सह्या होतील, त्यावर शिक्का मारला जाईल, साक्षीदारांच्या सह्या होतील, कारण मी त्यांची पूर्वीची समृद्धी#32:44 किंवा त्यांना बंदिवासातून परत आणेन निश्चित परत देईन, असे याहवेह जाहीर करतात.”

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 32: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन