YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 31

31
1याहवेह जाहीर करतात, “त्याकाळी मी इस्राएलमधील सर्व कुळांचा परमेश्वर असेन व ते माझे लोक असतील.”
2याहवेह जे म्हणतात ते असे:
“जे तलवारीच्या प्रहारातून वाचले
त्यांना रानात अनुकूलता सापडेल
इस्राएलला विश्रांती देण्यासाठी मी स्वतः येईन.”
3कारण पूर्वी याहवेहने आम्हाला दर्शन दिले व म्हटले:
“मी सार्वकालिक प्रीतीने तुमच्यावर प्रीती केली आहे;
मी अविनाशी प्रेमदयेने तुम्हाला माझ्याकडे ओढून घेतले आहे.
4मी तुला पुन्हा उभारेन,
आणि तू, इस्राएली कुमारिके, पुनर्वसित होशील.
तू पुन्हा तुझे खंजीर घेशील
आणि बाहेर जाऊन आनंदाने नृत्य करशील.
5शोमरोनच्या डोंगरावर
तू पुन्हा आपले द्राक्षमळे लावशील;
शेतकरी ते मळे लावतील
व स्वतःची फळे खाण्याचा आनंद उपभोगतील.
6‘चला, उठा, आपण सीयोनकडे जाऊ,
आपले परमेश्वर याहवेहकडे, जाऊ या.’ ”
पहारेकरी एफ्राईमच्या टेकड्यांवरून
अशी आरोळी मारण्याचा दिवस येत आहे,
7याहवेह असे म्हणतात:
“याकोबासाठी हर्षाने गाणी गा;
सर्वश्रेष्ठ इस्राएली राष्ट्रासाठी गर्जना करा.
तुमचे स्तुतिगान जाहीरपणे ऐकू यावे आणि म्हणा,
‘याहवेह, आपल्या लोकांचे,
इस्राएलाच्या अवशेषाचे तारण करा’
8पाहा, मी त्यांना उत्तरेकडील देशातून आणेन
आणि पृथ्वीच्या दिगंतापासून गोळा करेन.
त्यांच्यात आंधळे व पांगळे,
गर्भवती स्त्रिया, प्रसूती वेदना लागलेल्या माता असतील;
फार मोठा समुदाय परत येईल.
9ते आनंदाश्रू ढाळतील.
मी त्यांना परत आणतांना ते प्रार्थना करतील.
मी त्यांना जलप्रवाहाच्या बाजूने चालवेन
समतल भूमीवरून ते न अडखळता चालतील,
कारण मी इस्राएलचा पिता आहे,
आणि एफ्राईम माझा ज्येष्ठपुत्र आहे.
10“अहो राष्ट्रांनो, याहवेहचे वचन ऐका,
आणि दूरवरील सर्व सागरतीरांवर ते जाहीर करा:
‘ज्यांनी इस्राएली लोकांना विखरले, तेच त्यांना एकत्र करतील.
मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपांची निगा राखतील.’
11याहवेह याकोबाची सुटका करतील
आणि त्यांच्यापेक्षा बलाढ्य राष्ट्रांपासून त्यांना सोडवितील.
12ते येतील आणि सीयोनाच्या टेकड्यांवर हर्षगीते गातील;
याहवेहच्या विपुल पुरवठ्यासाठी—
धान्य, नवा द्राक्षारस, आणि जैतुनाचे तेल,
गुरातील व कळपातील पिल्लांसाठी आनंद करतील.
भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे ते होतील
आणि त्यांची सर्व दुःखे नाहीशी होतील.
13त्या समयी तरुण कुमारिका नृत्य करून हर्षावतील,
तरुण व ज्येष्ठ लोकही त्यात सहभागी होतील.
कारण मी त्यांच्या विलापाचे आनंदात रूपांतर करेन;
मी त्यांचे सांत्वन करेन आणि दुःखाऐवजी त्यांना हर्ष प्रदान करेन.
14मी मंदिरातील याजकांना विपुल पुरवठ्याने समाधानी करेन,
आणि माझे लोक भरघोस साठ्याने तृप्त होतील.”
असे याहवेह जाहीर करतात.
15याहवेह असे म्हणतात:
“रामाह मधून आवाज ऐकू येत आहे,
शोक आणि घोर आकांत,
राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे.
ती सांत्वन पावण्यास नकार देते,
कारण ते आता राहिले नाहीत.”
16परंतु याहवेह असे म्हणतात:
“तुझा रुदनस्वर आणि
तुझ्या डोळ्यातील अश्रू आता आवर,
कारण तुझ्या कार्यास फलप्राप्ती होणार आहे,”
याहवेह असे जाहीर करतात
“ते शत्रूच्या देशातून परत येतील.
17तुझ्या वंशजासाठी आशा आहे,”
याहवेह असे जाहीर करतात.
तुझी मुले आपल्या देशात परत येतील.
18“मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले:
‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे,
आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे.
मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन,
कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात.
19मी भरकटल्यानंतर,
मला पश्चात्ताप झाला;
मला समज आल्यानंतर,
मी दुःखातिशयाने ऊर बडवून घेतला.
माझ्या तरुणपणाच्या दिवसात मी जे आचरण केले,
त्यामुळे मी लज्जित व अपमानित झालो आहे.’
20हा एफ्राईम माझा लाडका पुत्र नाही का,
जे माझे लेकरू, मला अत्यंत सुखदायक?
जरी मी बरेचदा त्याच्याविरुद्ध बोललो,
तरी मला आताही त्याची आठवण येते.
म्हणून माझ्या मनाला त्याची ओढ लागली आहे;
मला त्याची अत्यंत दया येते.”
असे याहवेह जाहीर करतात.
21“जाताना वाटेवर खुणा कर;
दिशादर्शक लाव.
तू गेलीस तो महामार्ग ध्यानात ठेव,
त्या मार्गावर लक्ष ठेव.
हे इस्राएली कुमारी, परत ये,
तू आपल्या नगरांमध्ये परत ये.
22अगे विश्वासघातकी कन्ये,
तू कुठवर भटकत राहणार?
याहवेह पृथ्वीवर नवीन गोष्ट घडविणार आहेत—
स्त्री पुरुषाकडे परत#31:22 किंवा सुरक्षा देईल येईल.”
23सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “मी जेव्हा बंदिवासातून त्यांना परत आणेन, तेव्हा यहूदीयामधील व त्यांच्या नगरांमधील लोक असे म्हणतील: हे समृद्ध नगरी, ‘हे पवित्र डोंगरा, याहवेह तुला आशीर्वादित करो’ 24मग यहूदीया नगरवासी—शेतकरी व कळप घेऊन फिरणारे मेंढपाळ सर्वच एकत्र नांदतील. 25मी थकलेल्यांना व मूर्छित झालेल्यांना ताजेतवाने व संतुष्ट करेन.”
26एवढ्यात मी जागा झालो व सभोवती पाहिले. माझी झोप अत्यंत सुखद होती.
27याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत जेव्हा लोकांच्या व गुरांच्या वंशजाचे मी इस्राएल व यहूदीयामध्ये रोपण करेन. 28जसे त्यांना उपटून टाकताना व विदीर्ण होतांना, जमीनदोस्त होतांना, नष्ट होतांना व विपत्ती येत असताना लक्षपूर्वक नजर ठेवून होतो, तर पुन्हा त्यांचे रोपण व उभारणेही लक्ष लावून बघेन,” असे याहवेह जाहीर करतात. 29“लोक त्या दिवसात पुन्हा म्हणणार नाहीत,
‘पालकांनी आंबट द्राक्षे खाल्ली,
आणि मुलांचे दात आंबले.’
30कारण प्रत्येकजण स्वतःच्या पापांमुळे मरेल; जो कोणी आंबट द्राक्षे खाईल—त्याचेच दात आंबतील.
31“असे दिवस येतील जेव्हा,
इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी
मी एक नवीन करार करेन,”
याहवेह म्हणतात.
32“मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून
त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले,
तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या
कराराप्रमाणे हा करार नसेल.
मी जरी त्यांचा पती होतो#31:32 किंवा मी त्यांच्यापासून दूर गेलो,
तरी त्यांनी माझा करार मोडला.”
असे याहवेह जाहीर करतात.
33“परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा”
याहवेह जाहीर करतात, “त्या वेळेनंतर
मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन,
आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन,
मी त्यांचा परमेश्वर होईन,
आणि ते माझे लोक होतील.
34कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही,
किंवा ‘याहवेहला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही,
कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण
मला ओळखतील,”
असे याहवेह जाहीर करतात.
“मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन
व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.”
35याहवेह असे म्हणतात,
दिवसा सूर्यप्रकाश द्यावा म्हणून
ज्यांनी सूर्याला नियुक्त केले,
व रात्री प्रकाश देण्यासाठी
चंद्र व ताऱ्यांना आज्ञा दिली,
गर्जना करणार्‍या लाटा उसळाव्यात म्हणून
जे समुद्र ढवळतात;
त्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह असे आहे:
36“जर हे नियम माझ्या नजरेपुढून नाहीसे झाले तरच
माझ्यापुढे एक राष्ट्र म्हणून
इस्राएलचे अस्तित्व समाप्त होईल.”
याहवेह असे जाहीर करतात.
37याहवेह असे म्हणतात:
“जर आकाशाचे मोजमाप करता आले असते
व पृथ्वीच्या पायांचा थांग लावता आला असता,
तर मी माझ्या इस्राएली लोकांच्या सर्व वंशजांना
त्यांनी जे सर्व केले त्याबद्दल त्यांना नाकारले असते,”
याहवेह जाहीर करतात.
38याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत, कोपर्‍यातील हनानेलच्या बुरुजापासून कोपर्‍याच्या वेशीपर्यंत या नगरीची पुनर्बांधणी होईल. 39आणि गारेबच्या टेकडीपासून गोआहपर्यंत मापनसूत्र विस्तारित केले जाईल. 40संपूर्ण खोरे जिथे प्रेते व राख फेकण्यात येत असे, व त्याचप्रमाणे किद्रोनच्या खोऱ्यापर्यंतची आणि तिथून पूर्वेकडील घोडवेशी पर्यंतची सर्व शेते याहवेहला पवित्र अशी होतील. या नगराचा पुन्हा कधीही पाडाव किंवा विध्वंस होणार नाही.”

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 31: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन