YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 6:13-24

शास्ते 6:13-24 MRCV

गिदोन त्यास म्हणाला, “महाराज, मला माफ करा, परंतु जर याहवेह आमच्यासह असते तर हे सर्व आमच्यासोबत का घडले? आमच्या पूर्वजांनी सांगितलेले त्यांचे सर्व चमत्कार कुठे आहेत, जेव्हा ते म्हणाले, ‘परमेश्वराने आम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले नाही का?’ पण आता याहवेहने आम्हाला सोडून दिले आहे आणि आम्हाला मिद्यानच्या हाती दिले आहे.” याहवेह त्याच्याकडे वळून म्हणाले, “आपल्या बळाचा उपयोग कर आणि जा इस्राएलला मिद्यान्यांच्या हातून सोडव. मी तुला पाठवित नाही का?” गिदोनाने उत्तर दिले, “महाराज, मला माफ करा, मी इस्राएली लोकांना कसा काय सोडविणार? माझे कुटुंब संपूर्ण मनश्शेह गोत्रातील अत्यंत दुर्बल असे कुटुंब आहे आणि माझ्या पूर्ण कुटुंबात मला अत्यंत कनिष्ठ समजले जाते.” याहवेहने उत्तर दिले, “मी तुझ्याबरोबर असेन आणि तू सर्व मिद्यान्यांचा असा नायनाट करशील की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही.” गिदोनाने प्रत्युत्तर दिले, “जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट झाले असाल तर ते सिद्ध करण्यासाठी मला एखादे चिन्ह दाखवा. मी परत येऊन माझे अर्पण तुमच्यापुढे ठेवीपर्यंत कृपा करून जाऊ नका.” आणि याहवेह म्हणाले, “तू परत येईपर्यंत मी वाट पाहीन.” गिदोन आत गेला, त्याने एक करडू कापून कालवण तयार केले आणि पिठाच्या एक एफापासून खमीर नसलेली भाकर केली. टोपलीत मांस आणि त्याचा रस्सा एका भांड्यात ठेवून त्याने ते बाहेर आणले आणि एलाच्या वृक्षाखाली त्याला अर्पण केले. परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “मांस व बेखमीर भाकरी त्या तिथे असलेल्या खडकावर ठेव आणि रस्सा त्यावर ओत.” गिदोनाने सूचनांप्रमाणे केले, तेव्हा याहवेहच्या दूताने आपल्या हातातील काठीने त्या मांसास व बेखमीर भाकरीस स्पर्श केला, त्याबरोबर खडकातून अग्नी निघाला व त्या अग्नीने ते मांस व त्या भाकरी भस्म करून टाकल्या. आणि याहवेहचा तो दूत एकाएकी अंतर्धान पावला. जेव्हा गिदोनाच्या लक्षात आले की तो खरोखर याहवेहचा दूत होता, तेव्हा तो मोठ्याने म्हणाला, “अरेरे, अहो सार्वभौम याहवेह! मी तर मरणार, कारण मी याहवेहच्या दूताला समोरासमोर पाहिले आहे!” परंतु याहवेहने त्याला उत्तर दिले, “शांती असो! भिऊ नकोस. तू मरणार नाहीस.” म्हणून गिदोनाने तिथे याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि तिला याहवेह शालोम, याहवेह शांती देतात असे नाव दिले. ही वेदी अद्यापही अबियेजरीकरांच्या मुलुखातील ओफराह या गावी आहे.

शास्ते 6 वाचा