YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 13:1-14

शास्ते 13:1-14 MRCV

पुन्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, म्हणून याहवेहने त्यांना चाळीस वर्षे पलिष्टी लोकांच्या अंमलाखाली ठेवले. दान कुळातील सोराह येथील एक मनुष्य होता, ज्याचे नाव मानोहा होते, त्याची पत्नी होती, जी वांझ असून ती लेकरांना जन्म देऊ शकत नव्हती. याहवेहच्या दूताने तिला दर्शन दिले आणि म्हणाला, “तू वांझ आहे आणि तुला मूल नाही, तरीपण तू गर्भवती होशील आणि एका पुत्राला जन्म देशील. तू द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नकोस आणि अशुद्ध असलेले काहीही सेवन करू नकोस. कारण तू गर्भवती होशील आणि पुत्राला जन्म देशील, गर्भावस्थेपासूनच तो परमेश्वराला समर्पित नाजीर असा होईल म्हणून त्याच्या केसाला वस्तऱ्याचा स्पर्श करू नकोस, कारण इस्राएलला पलिष्ट्यांच्या हातून सोडविण्यास तोच नेतृत्व करेल.” तेव्हा ती स्त्री आपल्या पतीकडे गेली आणि त्याला सांगितले, “परमेश्वराचा एक पुरुष माझ्याकडे आला. तो परमेश्वराच्या दूतासारखा दिसत होता, अतिशय अद्भुत. तो कुठून आला होता हे मी त्याला विचारले नाही आणि त्याने आपले नावही मला सांगितले नाही. परंतु त्याने मला सांगितले, ‘तू गर्भवती होशील आणि एक पुत्रास जन्म देशील. आतापासून द्राक्षारस किंवा मद्य घेऊ नको, अशुद्ध असे काहीही खाऊ नको, कारण ते बाळ, तो पुत्र गर्भावस्थेपासून त्याच्या मृत्यूपर्यंत परमेश्वराचा नाजीर असा होईल.’ ” तेव्हा मानोहाने याहवेहला प्रार्थना केली: “हे प्रभू, तुमच्या सेवकाला क्षमा करा. परमेश्वराचा दूत पुन्हा आमच्याकडे येईल असे करा म्हणजे जे बाळ जन्मास येणार आहे त्याचे संगोपन कसे करावे ते आम्हास शिकवेल.” परमेश्वराने मानोहानाच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि परमेश्वराचा दूत परत त्या स्त्रीकडे आला, जेव्हा ती शेतात बसलेली होती; परंतु तिचा पती मानोहा तिच्याबरोबर नव्हता म्हणून ती स्त्री लगबगीने आपल्या पतीस सांगण्यास गेली, “जो पुरुष त्या दिवशी माझ्या दृष्टीस पडला होता तो इथे आहे!” मानोहा उठला आणि आपल्या पत्नीसह त्या ठिकाणी गेला, तो त्या पुरुषाजवळ गेला व त्याला विचारले, “त्या दिवशी माझ्या पत्नीशी बोलणारे आपणच आहात का?” त्याने उत्तर केले, “मीच आहे.” “तेव्हा मानोहाने त्याला विचारले, जेव्हा तुमचे शब्द पूर्ण होतील तेव्हा त्या बाळाच्या कार्यासाठी व जीवनासाठी कोणते नियम असावे?” याहवेहच्या दूताने मानोहाला उत्तर दिले, “तुझ्या पत्नीने जे मी तिला सांगितले आहे ते सर्व तिने करावे. तिने द्राक्षाच्या वेलीतून आलेले कोणतेही उपज खाऊ नये, द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये किंवा जे अशुद्ध आहे असे काहीही खाऊ नये. ज्या सर्व आज्ञा तिला दिल्या आहेत त्या तिने पाळाव्या.”

शास्ते 13 वाचा