YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 2:1-10

याकोब 2:1-10 MRCV

प्रिय बंधू आणि भगिनींनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आपण पक्षपात करू नये. एखादा मनुष्य तुमच्या सभांमध्ये सोन्याची अंगठी घातलेला आणि उंची कपडे परिधान केलेला आला, व एक गरीब मनुष्य जुने आणि मळीन कपडे घातलेला आला. तर तुम्ही ज्याने उंची कपडे परिधान केले आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष देता आणि म्हणता, “ही जागा तुमच्यासाठी चांगली आहे,” परंतु त्या गरीब मनुष्याला म्हणता, “तिथे उभा राहा” किंवा “माझ्या पायाजवळ जमिनीवर बस,” तुम्ही आपसात भेदभाव केला की नाही आणि दुष्ट विचारांनी न्याय करणारे झाले की नाही? माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ऐका, परमेश्वराने जगाच्या दृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासामध्ये धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना वचनानुसार राज्याचे वारस होण्यास निवडले नाही का? परंतु तुम्ही गरिबांचा अपमान केला आहे. धनवान लोकच तुमचे शोषण करतात की नाही? तेच लोक तुम्हाला न्यायालयात खेचतात की नाही? ज्या उत्कृष्ट नावावरून तुमची ओळख होते, त्या नावाची निंदा करणारे तेच नाहीत का? “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा,” हा शास्त्र वचनात आढळणारा राजमान्यनियम तुम्ही पाळता तर चांगले करता. पण तुम्ही पक्षपात करता, तर पाप करता आणि नियम मोडणारे म्हणून नियमानुसार दोषी ठरता. जो कोणी सर्व नियम पाळतो, परंतु एका बाबीविषयी अडखळतो तो सर्व नियम मोडणार्‍या एवढाच दोषी आहे.