YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 45:1-8

उत्पत्ती 45:1-8 MRCV

आता मात्र आपल्या सेवकांसमोर योसेफाचा भावनावेग अनावर झाला आणि तो मोठ्याने ओरडला, “सगळ्यांनी माझ्या समक्षतेतून बाहेर जावे!” योसेफाने तिथे कोणी नसताना स्वतःला आपल्या भावांसमोर प्रगट केले. मग तो इतक्या मोठमोठ्याने रडू लागला की, ते इजिप्तच्या लोकांनी ऐकले आणि फारोहच्या घराण्यातील लोकांनीही ते ऐकले. तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे! माझे वडील अद्याप जिवंत आहेत काय?” परंतु त्याचे भाऊ इतके घाबरले होते की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडेना. तेव्हा योसेफाने आपल्या भावांना म्हटले, “माझ्याजवळ या!” ते जवळ आल्यावर तो त्यांना म्हणाला, “ज्या भावाला विकून तुम्ही इजिप्त देशात पाठवून दिले होते, तो मी तुमचा भाऊ योसेफ आहे! तुम्ही मला अशा रीतीने वागविले म्हणून वाईट वाटून घेऊ नका व त्रागा करून घेऊ नका, कारण तुमचे जीव वाचविण्याकरिता परमेश्वरानेच मला तुमच्यापुढे इकडे पाठविले. दुष्काळ पडून आता दोनच वर्षे झाली आणि अद्यापही पाच वर्षे आहेत. त्या काळात नांगरणी व कापणी अजिबात होणार नाही. परंतु पृथ्वीवर जे उरले आहेत, त्या तुम्हाला वाचवण्यासाठी आणि मोठ्या मुक्तिद्वारे तुमचे जीवन सुरक्षित करण्यासाठी परमेश्वराने मला तुमच्या आधी इथे पाठवले आहे. “म्हणजे आता तुम्ही नव्हे तर खुद्द परमेश्वरानेच मला इकडे पाठविले. त्यांनीच मला फारोहचा सल्लागार, त्याच्या घराण्याचा व्यवस्थापक आणि संपूर्ण इजिप्त देशाचा अधिपती केले आहे.

उत्पत्ती 45 वाचा