तेव्हा योसेफ म्हणाला, “या स्वप्नाचा अर्थ असा: तीन फांद्या म्हणजे तीन दिवस. या तीन दिवसात फारोह तुला तुरुंगातून सोडून देईल आणि तू स्वतः परत राजाच्या हाती प्याला देशील, जसा तू आधी प्यालेबरदार म्हणून देत होता. पण जेव्हा तुझ्याबरोबर सर्वकाही ठीक होईल, तेव्हा माझी आठवण ठेव आणि माझ्यावर कृपा दाखव, फारोहजवळ माझा उल्लेख कर आणि मला या तुरुंगातून बाहेर काढ. कारण मला इब्री लोकांच्या देशातून येथे पळवून आणण्यात आले आणि अंधारकोठडीची शिक्षा मला मिळावी, असे मी काही केले नाही.” त्याच्या स्वप्नाचे उत्तर चांगले निघाले आहे हे पाहून, रोटी भाजणारा प्रमुख योसेफाला म्हणाला, “मला देखील एक स्वप्न पडले आहे: मला माझ्या डोक्यावर रोट्यांच्या तीन टोपल्या दिसल्या. सर्वात वरच्या टोपलीमध्ये फारोहसाठी भटारखान्यातील सर्वप्रकारचे उत्कृष्ट प्रतीचे खाद्यपदार्थ होते; परंतु पक्षी येऊन माझ्या डोक्यावरील टोपलीतून ते पदार्थ खाऊ लागले.” योसेफाने अर्थ सांगताना म्हटले, “या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस होत. आजपासून तीन दिवसांनी फारोह तुझा शिरच्छेद करेल व तुझा मृतदेह सुळावर ठेवेल आणि पक्षी येऊन तुझे मांस टोचून खातील.” आता तिसर्या दिवशी फारोहचा वाढदिवस होता आणि त्याने आपल्या सर्व सरदारांसाठी मेजवानी दिली. त्याने आपल्या सरदारांसमोर मुख्य प्यालेबरदार आणि प्रमुख रोटी भाजणारा यांचे मस्तक उंचावले: यावेळी त्याने मुख्य प्यालेबरदारला त्याच्या कामावर पुन्हा नेमले, तो फारोहच्या हाती पुन्हा प्याला देऊ लागला— परंतु प्रमुख रोटी भाजणार्याला योसेफाने भाकीत केल्याप्रमाणे सुळावर चढविण्याची शिक्षा दिली. मुख्य प्यालेबरदाराला योसेफाचे स्मरण राहिले नाही; त्याला तो विसरला.
उत्पत्ती 40 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 40:12-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ