YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 3:9-20

उत्पत्ती 3:9-20 MRCV

परंतु याहवेह परमेश्वराने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कुठे आहेस?” आदाम म्हणाला, “बागेत मी तुमचा आवाज ऐकला आणि मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो; त्यामुळे लपून बसलो.” याहवेह म्हणाले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?” त्यावर आदाम म्हणाला, “जी स्त्री तुम्ही माझ्या सोबतीला दिली; तिने मला त्या झाडाची फळे दिली आणि मी ती खाल्ली.” तेव्हा याहवेह परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाले, “तू हे काय केलेस?” त्यावर ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ पाडली आणि मी ते फळ खाल्ले.” याहवेह परमेश्वर सर्पाला म्हणाले, “कारण तू हे केलेस म्हणून, “तू सर्व पाळीव प्राण्यांहून, आणि सर्व वन्यपशूहून अधिक शापित आहेस! तू तुझ्या पोटावर सरपटशील आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस माती खाशील. तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी शत्रुत्व निर्माण करेन; तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल आणि तू त्याची टाच फोडशील.” नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाले, “तुझ्या प्रसूतिकाळात मी तुझे क्लेश अत्यंत वाढवेन; वेदनांनी तू तुझ्या संतानास जन्म देशील, तुझ्या पतीकडे तुझी ओढ राहील, आणि तो तुजवर सत्ता गाजवील.” नंतर ते आदामाला म्हणाले, “तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, ते खाल्लेस म्हणून आता, “तुझ्यामुळे भूमी शापित झाली आहे; तू तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस अत्यंत क्लेशमय कष्ट करून तिचा उपज खाशील. भूमी तुझ्यासाठी काटे आणि कुसळे उगवील, आणि तू शेतातील पीक खाशील. ज्यामधून तू घडविला गेलास त्या मातीत परत जाऊन मिळेपर्यंत तू घाम गाळून अन्न खाशील, कारण तू माती आहेस आणि तू मातीतच परत जाऊन मिळशील.” आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा असे ठेवले, कारण ती सर्व सजिवांची माता होती.

उत्पत्ती 3 वाचा