YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 35:20-35

निर्गम 35:20-35 MRCV

मग इस्राएलचा सर्व समुदाय मोशेच्या समक्षतेतून निघून गेला, आणि ज्यांची इच्छा असेल व ज्यांच्या हृदयाला स्फूर्ती मिळाली त्यांनी सभामंडपाच्या कामासाठी व त्याच्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांची अर्पणे याहवेहसाठी आणली. ज्या कोणाला इच्छा झाली, त्या स्त्री आणि पुरुषांनी येऊन सर्वप्रकारचे सोन्याचे दागिने, रत्नखचित पीना, कानातील डूल, अंगठ्या आणि दागिने आणले. त्या सर्वांनी आपले सोने याहवेहसाठी ओवाळणीचे अर्पण म्हणून दिले. ज्यांच्याकडे निळे, जांभळे किंवा किरमिजी कापड किंवा रेशमी तागाचे होते किंवा बोकडाचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी किंवा टिकाऊ चर्म होते ते आणले. चांदी किंवा कास्याची अर्पणे आणणार्‍यांनी ती याहवेहसाठी आणली आणि ज्या कोणाकडे बाभळीचे लाकूड होते, ते त्यांनी बांधकामाच्या कोणत्याही भागात उपयोगी पडेल असे म्हणून आणले. प्रत्येक कुशल स्त्रीने निळे, जांभळे आणि किरमिजी सूत व रेशमी ताग जे तिने आपल्या हाताने विणले होते ते आणले. आणि ज्या सर्व स्त्रियांना इच्छा झाली आणि ज्या सूतकताईत कुशल होत्या त्यांनी बोकडाचे केस कातले. पुढार्‍यांनी एफोद व ऊरपट यावर लावण्यासाठी गोमेद व इतर रत्ने आणली. त्याचप्रमाणे त्यांनी दिव्यासाठी आणि अभिषेकासाठी आणि सुवासिक धुपासाठी जैतुनाचे तेल व सुगंधी मसाले आणले. याहवेहने मोशेद्वारे जे काम आज्ञापिले होते त्यासाठी इस्राएली लोकांमधील सर्व इच्छुक पुरुष व स्त्रियांनी याहवेहकरिता स्वखुशीने अर्पणे आणली. मग मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, “पाहा, याहवेहने यहूदाहच्या गोत्रातील, हूराचा पुत्र, उरी याचा पुत्र बसालेल याला निवडले आहे, आणि याहवेहने त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे— सोने, चांदी आणि कास्याचे कलाकौशल्य करावे, आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करावे. आणि याहवेहने त्याला व दान गोत्रातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब या दोघांना इतरांनाही शिकविण्याची क्षमता दिली आहे. याहवेहने त्यांना सर्वप्रकारचे कोरीव काम, कारागिरीचे काम, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुती व रेशमी तागावर भरतकाम, विणकाम; अशा सर्वप्रकारच्या विणकरांना कारागिरीचे—कौशल्याचे—काम करण्याच्या दानांनी भरले आहे.

निर्गम 35 वाचा