YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 3:14-22

निर्गम 3:14-22 MRCV

परमेश्वर मोशेला म्हणाले, “जो मी आहे तो मी आहे. इस्राएली लोकांना सांग: ‘मी आहे’ यांनी मला पाठवले आहे.” परमेश्वर मोशेला आणखी म्हणाले, “इस्राएलास सांग, ‘अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर या तुमच्या पूर्वजांचा परमेश्वर याहवेहने मला तुमच्याकडे पाठविले आहे.’ “हेच माझे सनातन नाव आहे, आणि सर्व पिढ्यांपर्यंत याच नावाने तुम्ही मला हाक मारणार. “जा आणि इस्राएलांच्या सर्व वडीलजनांना एकत्र बोलव आणि त्यांना सांग, तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांचे परमेश्वर याहवेह हे मला प्रकट झाले आणि म्हणाले, मी तुमच्याकडे लक्ष दिले आहे आणि इजिप्तमध्ये तुमच्याबाबतीत जे काही घडत आहे ते मी पाहिले आहे. आणि इजिप्तमधील तुमच्या या दुःखातून तुम्हाला बाहेर काढून कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोक राहत असलेल्या दूध व मध वाहत्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याचे मी वचन दिलेले आहे. “इस्राएलचे वडीलजन तुझा शब्द मानतील. मग तू आणि वडीलजन इजिप्तच्या राजाकडे जाऊन त्याला सांगा, याहवेह, इब्रींचे परमेश्वर, यांनी आम्हाला दर्शन देऊन सांगितले आहे की आम्ही तीन दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर रानात जाऊन याहवेह आमचे परमेश्वर यास यज्ञ अर्पण करावा म्हणून तू आम्हाला जाऊ दे. पण मला माहीत आहे की, बलवान हाताने दबाव आणल्याशिवाय इजिप्तचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही. म्हणून मी आपला हात लांब करेन व माझ्या चमत्कारांनी इजिप्तवर प्रहार करेन. मग शेवटी तो तुम्हाला जाऊ देईल. “आणि या लोकांवर इजिप्तच्या लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करेन म्हणजे तुम्ही रिक्तहस्ते बाहेर पडणार नाही. इजिप्त देशातील स्त्रियांकडून व तुमच्या शेजारणीकडून प्रत्येक इस्राएली स्त्रीने सोन्याचे व चांदीचे दागिने व उत्तमोत्तम वस्त्रे मागून घ्यावीत व तुम्ही ते आपल्या मुलांवर व मुलींवर चढवावे, याप्रकारे तुम्ही इजिप्त देशातील लोकांना लुटाल.”

निर्गम 3 वाचा