YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 10:1-15

निर्गम 10:1-15 MRCV

मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या अधिकार्‍यांची मने कठीण केली आहेत, अशासाठी की मी त्यांच्यामध्ये माझे चमत्कार करावे व तुम्हीही आपल्या लेकरांस व नातवंडास मी इजिप्तच्या लोकांशी कसे कठोरपणे वागलो व त्यांच्यामध्ये माझे चमत्कार कसे केले ते सांगावे आणि तुम्हाला समजावे की मी याहवेह आहे.” मग मोशे व अहरोन फारोहकडे गेले व त्याला म्हणाले, “इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, ‘अजून किती काळ माझ्यासमोर नम्र होण्यास तू नाकारशील? माझ्या लोकांना जाऊ दे, म्हणजे ते माझी उपासना करतील. तू जर त्यांना जाऊ दिले नाहीस, तर उद्या मी तुझ्या संपूर्ण देशावर टोळ आणेन. ते तुझी भूमी आच्छादून टाकतील की, जमीन मुळीच दिसणार नाही, शेतात असलेल्या झाडांसह, गारांच्या व पावसाच्या मारातून जे पीक वाचले आहे त्याचा ते नाश करतील, एवढेच नव्हे तर वनात वाढणारी झाडेही ते खाऊन टाकतील. ते तुझी घरे व तुझ्या अधिकार्‍यांची व सर्व इजिप्तच्या लोकांची घरे भरून टाकतील; इजिप्तच्या इतिहासात तुझे वडील व तुझे पूर्वज या देशाचे रहिवासी झाले तेव्हापासून आजपर्यंत असे झालेले त्यांनी कधी पाहिले नाही.’ ” मग मोशे वळून फारोहपासून निघून गेला. फारोहचे अधिकारी त्याला म्हणाले, “किती काळ हा मनुष्य आम्हाला पाश म्हणून असणार? याहवेह त्यांचा परमेश्वर यांची उपासना करावी म्हणून या लोकांना जाऊ द्या. इजिप्तचा नाश झाला आहे याची तुम्हाला जाणीव नाही काय?” मग मोशे व अहरोन यांना फारोहकडे पुन्हा बोलाविण्यात आले. फारोह त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचा परमेश्वर याची उपासना करावी म्हणून तुम्ही जा, पण कोण कोण जाणार हे मला सांग.” मोशेने उत्तर दिले “आम्ही आमचे तरुण व वृद्ध, आमचे पुत्र व कन्या आणि आमची शेरडेमेंढरे व गुरे या सर्वांसह जाणार. कारण आम्ही सर्वांनीच याहवेहचा सण साजरा करणे आवश्यक आहे.” तेव्हा फारोह त्यांना म्हणाला, “मी तुमच्या मुलाबाळांस व स्त्रियांना जाऊ दिले तर याहवेह तुम्हाबरोबर असो! खचितच तुम्ही दुष्टता योजली आहे. नाही! याहवेहची उपासना करण्यासाठी फक्त पुरुषांनीच जावे, कारण तशीच मागणी तुम्ही करत होता.” मग मोशे व अहरोनास फारोहच्या पुढून हाकलून देण्यात आले. मग याहवेह मोशेला म्हणाले, “तू आपला हात इजिप्त देशावर लांब कर म्हणजे टोळधाड येईल व गारांच्या वर्षावातून वाचलेली वनस्पती जी भूमीवर वाढत आहे त्या सर्वांचा ती नाश करेल.” तेव्हा मोशेने आपली काठी इजिप्त देशावर उगारली, आणि याहवेहने तो संपूर्ण दिवस व ती संपूर्ण रात्र पूर्वेचा वारा देशावर वाहविला. सकाळपर्यंत वार्‍याने टोळ आणले. त्यांनी संपूर्ण इजिप्त देश व्यापून टाकला व ते मोठ्या संख्येने देशाच्या प्रत्येक भागात जाऊन राहिले. इतिहासात अशी भयंकर टोळांची पीडा ना कधी आली होती ना पुढे कधी येणार. कारण टोळांनी जमिनीचा पृष्ठभाग अगदी काळा होईपर्यंत झाकून टाकला व गारातून जे वाचले होते ते सर्वकाही—शेतातील सर्व पीक व झाडावरील प्रत्येक फळ त्यांनी फस्त केले. संपूर्ण इजिप्त देशात ना झाडे ना वनस्पती, काहीही हिरवे असे राहिले नाही.

निर्गम 10 वाचा