YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 9:7-21

अनुवाद 9:7-21 MRCV

तुम्ही त्या रानात याहवेह तुमच्या परमेश्वराला राग येईल असे वागलात, हे तुम्ही विसरू नका आणि याची नेहमी आठवण ठेवा. ज्या दिवशी तुम्ही इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून या ठिकाणी येईपर्यंत, तुम्ही याहवेहविरुद्ध सतत बंड केले. होरेब पर्वतावर तुम्ही त्यांना इतके संतप्त केले की याहवेह तुमचा नाश करणारच होते. याहवेहने तुमच्याशी केलेल्या कराराच्या दगडी पाट्या स्वीकारण्यासाठी मी त्या पर्वतावर चढून गेलो होतो. तिथे मी चाळीस दिवस व चाळीस रात्री होतो; त्या काळात मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीदेखील प्यालो नाही. याहवेहने दोन दगडी पाट्या मला दिल्या, ज्यावर परमेश्वराच्या बोटाने लिहिलेले होते. तुम्ही पर्वताच्या पायथ्याशी गोळा झालेले होता, त्यावेळी याहवेहने तुमच्याशी बोलताना पर्वतावर अग्नीतून सांगितलेल्या सर्व आज्ञा त्यावर होत्या. चाळीस दिवस व चाळीस रात्री लोटल्यानंतर, याहवेहने कराराच्या दोन दगडी पाट्या मला दिल्या. मग याहवेह मला म्हणाले, “ताबडतोब येथून उतरून खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्त देशातून बाहेर काढून आणले, ते भ्रष्ट झाले आहेत. मी त्यांना जे करण्याची आज्ञा दिलेली होती, त्यापासून बहकून त्यांनी स्वतःसाठी ओतीव मूर्ती तयार केली आहे.” याहवेह मला म्हणाले, “मी या लोकांना ओळखतो, हे ताठ मानेचे लोक आहेत. तू माझ्या आड येऊ नकोस, मी या लोकांचा नाश करेन आणि त्यांचे नाव पृथ्वीवरून पुसून टाकेन आणि त्यांच्याहीपेक्षा अधिक बलवान व बहुगुणित असे राष्ट्र मी तुझ्यापासून बनवीन.” नंतर मी मागे वळलो आणि पर्वतावरून खाली उतरत असताना पर्वत अग्नीने जळत होता आणि त्या कराराच्या दोन पाट्या माझ्या हातात होत्या. जेव्हा मी पाहिले की, याहवेह तुमच्या परमेश्वराविरुद्ध तुम्ही पाप केले आहे; तुम्ही तुमच्यासाठी वासराची ओतीव मूर्ती घडविली, असे माझ्या दृष्टीस पडले. याहवेहनी दिलेल्या आज्ञा पाळण्याचे सोडून तुम्ही किती लवकर पथभ्रष्ट झालात. तेव्हा मी त्या दोन दगडी पाट्या घेतल्या आणि माझ्या हातांतून फेकून, तुमच्या डोळ्यादेखत त्यांचा चुराडा केला. नंतर आणखी चाळीस दिवस व चाळीस रात्री मी याहवेहपुढे पालथा पडून राहिलो; मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीदेखील प्यालो नाही, कारण याहवेहच्या दृष्टीने वाईट आहे, तेच पाप तुम्ही करून त्यांचा क्रोध भडकाविला होता. मला याहवेहच्या रागाची आणि क्रोधाची भीती वाटली, कारण ते तुमचा नाश करण्याइतके रागावले होते. परंतु त्यावेळी सुद्धा याहवेहने माझे ऐकले. आणि याहवेह अहरोनवर अत्यंत संतप्त झाले व त्याचा नाश करणार होते, परंतु मी त्याच्यासाठी देखील प्रार्थना केली. मी तुमचे पापकृत्य, म्हणजे जे वासरू तुम्ही बनविले होते ते घेतले आणि अग्नीत जाळून त्याची कुटून धुळीसारखी बारीक पूड केली आणि ती धूळ डोंगरातून वाहणार्‍या ओहोळात फेकून दिली.

अनुवाद 9 वाचा