YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 26:1-11

अनुवाद 26:1-11 MRCV

जेव्हा तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वराने वतन दिलेल्या देशात प्रवेश कराल, तो जिंकून त्याचा ताबा घ्याल आणि तिथे वस्ती कराल, तेव्हा याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या भूमीतील प्रत्येक पिकाचे प्रथम उत्पन्न एका टोपलीत आणावे. नंतर याहवेह तुमचे परमेश्वर आपल्या नावासाठी जे वसतिस्थान निवडून देतील त्या ठिकाणी तुम्ही जावे आणि त्यावेळी सेवा करीत असलेल्या याजकास म्हणा, “याहवेह तुमच्या परमेश्वराला आज मी जाहीर करतो, की आमच्या पूर्वजांना वचन देऊ केलेल्या देशात मी आलो आहे.” मग याजक ती टोपली तुमच्या हातून घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीपुढे ठेवेल. नंतर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर म्हणावेः “आमचे पूर्वज अरामी, हे निर्वासित होऊन आश्रयासाठी इजिप्त देशास गेले. ते संख्येने अगदी थोडे होते, पण इजिप्त देशात ते एक विशाल, बलाढ्य आणि थोर राष्ट्र बनले. इजिप्त देशातील लोकांनी आम्हाला वाईट रीतीने वागविले, आमच्यावर जुलूम केला व कठोर परिश्रम लादले तेव्हा आम्ही याहवेहचा, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराचा धावा केला आणि याहवेहने आमचे गार्‍हाणे ऐकले, आमच्या अडचणी जाणल्या आणि आमच्यावर होत असलेला जुलूम व अत्याचार त्यांनी पाहिला. मग याहवेहने महान चमत्कारांनी, सामर्थ्यशाली बाहुबलाने व पसरलेल्या हातांनी आणि भयावह चिन्ह व चमत्कार करून आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले. त्यांनी आम्हाला या ठिकाणी आणले आणि दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला हा देश आम्हाला दिला; आता, हे याहवेह परमेश्वरा, तुम्ही जी भूमी आम्हाला दिली आहे, त्यात उगविलेल्या धान्याचे प्रथम उत्पन्न आम्ही आणले आहे.” नंतर ते अर्पण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे ठेवावे व त्यांची उपासना करावी. त्यानंतर याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्या सर्व चांगल्या गोष्टी तुम्हाला दिल्या, त्याबद्दल तुम्ही, लेवी व परदेशी लोक या सर्वांनी मिळून आनंदोत्सव साजरा करावा.

अनुवाद 26 वाचा