YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 1:1-18

अनुवाद 1:1-18 MRCV

इस्राएली लोक यार्देन नदीच्या पूर्वेस असणार्‍या रानातील अराबा नावाच्या दरीमध्ये तळ देऊन राहिले होते, त्यावेळी मोशे जे बोलला त्या सर्व गोष्टीची नोंद या पुस्तकात केलेली आहे. या प्रदेशात सूफ, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दीजाहाब इत्यादी शहरांचा समावेश होतो. (सेईर डोंगरमार्गे होरेब ते कादेश-बरनेआपर्यंतचा प्रवास अकरा दिवसाचा होता.) चाळिसाव्या वर्षाच्या, अकराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने इस्राएली लोकांना हे सर्व सांगितले. हे मोशेने जाहीर करण्यापूर्वीच अमोर्‍यांचा राजा सीहोनाचा हेशबोन येथे पराभव करण्यात आला होता व एद्रेई जवळील अष्टारोथ येथे बाशानचा राजा ओगचाही पराभव करण्यात आला होता. यार्देनच्या पूर्वेकडील मोआब प्रदेशात मोशे इस्राएली लोकांशी नियमांसंबंधी बोलला. तो म्हणाला: आपल्या याहवेह परमेश्वरांनी चाळीस वर्षांपूर्वी होरेब येथे आपल्याला सांगितले होते, “तुम्ही या पर्वताजवळ खूप दिवस राहिलात; आता तुम्ही येथून जा व अमोर्‍यांचा डोंगराळ प्रदेश, अराबाची दरी, नेगेव, कनान व लबानोन आणि भूमध्य समुद्रकिनार्‍यापासून ते फरात नदीच्या काठापर्यंत पसरलेल्या संपूर्ण प्रदेशात जाऊन वस्ती करा. पाहा, मी हा सर्व प्रदेश तुम्हाला देत आहे. तुम्ही जा व तो प्रदेश हस्तगत करा. कारण याहवेहने तो प्रदेश अब्राहाम, इसहाक व याकोब या तुमच्या पूर्वजास व त्यांच्या वंशजास दिलेला वचनदत्त देश आहे.” त्यावेळी मी तुम्हाला सांगितले होते, “माझ्या शक्तीपलीकडे असलेले मी एकट्यानेच वाहून नेणारे तुमचे मोठे ओझे माझ्यावर पडले आहे. कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमची संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे अगणित केली आहे, याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी जे तुम्हाला अभिवचन दिले होते, त्यानुसार तुमची संख्या हजारपटीने वाढवो आणि तुम्हाला आशीर्वाद देवो! तुमच्या समस्या, तुमचे ओझे व तुमची भांडणे माझ्यासारखा एकटा मनुष्य कसा सोडवू शकेल? तेव्हा तुम्हीच प्रत्येक गोत्रांमधून सुज्ञ, समजूतदार व प्रतिष्ठित अशी काही माणसे निवडा, म्हणजे मी त्यांना तुमचे पुढारी नेमीन.” तुम्ही मला उत्तर देऊन म्हणाला, “तुम्ही जे करण्याचा प्रस्ताव दिला ते उत्तम आहे.” म्हणून मी तुमच्या प्रत्येक गोत्रांतून प्रमुख, ज्ञानी आणि आदरणीय पुरुष घेतले आणि त्यांना हजारांवर, शंभरांवर, पन्नासांवर व दहांवर प्रमुख व अधिकारी म्हणून नेमले. आणि त्यावेळी मी तुमच्या न्यायाधीशांना आज्ञा केली, “तुमच्या लोकांचा वाद ऐकून त्यावर न्याय करावा, मग तो दोन इस्राएली लोकांमधील असो किंवा इस्राएली आणि तुमच्यामध्ये राहणारे परदेशी यांच्यातील असो. न्याय करताना पक्षपातीपणा दाखवू नका; लहान व मोठे यांचे म्हणणे समानतेत ऐकून घ्या. कोणालाही घाबरू नका; कारण न्याय हा परमेश्वराकडूनच असतो. ज्या तक्रारी तुम्हाला सोडविण्यास कठीण वाटतील, त्या माझ्याकडे आणा आणि मी ऐकेन.” आणि त्यावेळी मी तुम्हाला जे काही करावयाचे आहे ते सर्व सांगितले होते.

अनुवाद 1 वाचा