तेव्हा नबुखद्नेस्सर हा शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांच्यावर रागाने संतप्त झाला आणि त्याची त्यांच्याबद्दलीची भावना बदलली. नेहमीपेक्षा भट्टी सातपट तापवावी असा त्याने हुकूम सोडला, आणि शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांना बांधून भट्टीत फेकण्यासाठी त्याने आपल्या सैन्यातील बलदंड वीरांना बोलाविले. तेव्हा त्या पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रासह बांधण्यात आले आणि धगधगत्या भट्टीत फेकण्यात आले. राजाची आज्ञा कडक होती आणि भट्टी अतिशय तापली होती यामुळे ज्या सैनिकांनी शद्रख, मेशख आणि अबेदनगो यांना भट्टीत टाकण्यासाठी उचलले होते, त्यांनाच अग्नीच्या ज्वालांनी ठार केले, आणि हे तीन पुरुष शद्रख, मेशख व अबेदनगो घट्ट बांधलेले असे धगधगत्या भट्टीत फेकण्यात आले.
नबुखद्नेस्सर राजा चकित होऊन ताडकन उभा राहिला व आपल्या मंत्र्यांना विचारले, “आपण तीन माणसांना बांधून भट्टीत टाकले होते ना?”
ते म्हणाले, “होय, निश्चित महाराज.”
तो म्हणाला, “इकडे पाहा! मी चार पुरुष अग्नीत फिरत असलेले पाहत आहे आणि त्यांचे बंध सुटलेले आहेत आणि त्यांना कोणतीच हानी झालेली नाही, आणि त्यातील चौथा तर देवपुत्रासारखा दिसत आहे.”
नबुखद्नेस्सर त्या धगधगत्या भट्टीच्या दाराजवळ गेला आणि मोठ्याने हाक मारून म्हणाला, “परमोच्च परमेश्वराचे सेवक शद्रख, मेशख आणि अबेदनगो, बाहेर या! इकडे या!”
तेव्हा शद्रख, मेशख आणि अबेदनगो अग्नीतून बाहेर आले, मग राजपुत्र, राज्यपाल, सेनानायक, सल्लागार इत्यादी सर्व त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांच्या शरीराला विस्तवाची झळ लागली नाही, अथवा त्यांच्या डोक्याचा एक केससुद्धा होरपळला नव्हता; त्यांचे कपडे काळवंडले नव्हते आणि त्याच्या अंगाला धुराचा वासही येत नव्हता, असे सर्वांनी पाहिले.
तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, “शद्रख, मेशख व अबेदनगोचे परमेश्वर धन्यवादित असो. ज्यांनी राजाची आज्ञा मोडून आपल्या परमेश्वराशिवाय अन्य दैवतांची सेवा किंवा उपासना करावयाची नाही असे ठरवून मरण पत्करले, तेव्हा त्याने आपला दिव्यदूत पाठवून आपल्या विश्वासू सेवकांची सुटका केली.