YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषित 8:4-40

प्रेषित 8:4-40 MRCV

आता जे पांगलेले होते त्यांनी जिथे कुठे ते गेले तिथे शुभवार्तेच्या वचनाचा प्रसार केला. फिलिप्प खाली शोमरोनातील एका शहरात गेला आणि त्याने ख्रिस्ताबद्दल घोषणा केली. ज्यावेळी समुदायाने फिलिप्पाचे ऐकले व त्याने केलेली चिन्हे पाहिली, सर्वांनी त्याच्या म्हणण्याकडे बारकाईने लक्ष दिले. अनेक अशुद्ध आत्मे किंकाळी मारून निघून जात आणि अनेक पक्षघाती व पांगळे लोक बरे होत असत. त्या शहरात मोठा आनंद झाला होता. आता काही काळापर्यंत शिमोन नावाचा एक मनुष्य जादूटोणा करीत होता आणि त्याने शोमरोन शहरातील लोकांना चकित करून सोडले होते व तो आपण कोणी फार मोठे आहोत अशी फुशारकी मारीत असे. म्हणून सर्व उच्च व नीच लोक त्याच्याकडे लक्ष देत होते व जिला “परमेश्वराची महाशक्ती म्हणतात तो खरोखर हाच मनुष्य असला पाहिजे,” असे उद्गार काढीत होते. ते त्याच्यामागे जात होते कारण बराच काळापासून जादूटोणा करून त्याने त्यांना थक्क केले होते. परंतु जेव्हा लोकांनी परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता व येशू ख्रिस्ताचे नाव याबद्दलचा संदेश फिलिप्पाकडून ऐकला आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पुरुषांना व स्त्रियांना दोघांनाही बाप्तिस्मा देण्यात आला. शिमोनाने देखील विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. आता फिलिप्प जिथे जात असे तिथे तो त्याच्यामागे जाऊ लागला आणि चमत्कार व चिन्हे पाहून तो आश्चर्य करू लागला. यरुशलेममधील प्रेषितांनी जेव्हा शोमरोनातील लोकांनी परमेश्वराचे वचन स्वीकारल्याचे ऐकले, तेव्हा त्यांनी पेत्र व योहानाला शोमरोनात पाठविले. ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी तेथील नवीन विश्वासणार्‍यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली, कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा आलेला नव्हता; केवळ प्रभू येशूंच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा झाला होता. मग पेत्र व योहानाने आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला. शिमोनाने पाहिले की प्रेषितांनी हात ठेवले म्हणजे पवित्र आत्म्याचे दान मिळते, तेव्हा त्याने प्रेषितांना पैसे देऊ केले आणि म्हणाला, “मला देखील हे सामर्थ्य मिळू द्या म्हणजे ज्या कोणावर मी आपले हात ठेवेन तेव्हा त्यांना पवित्र आत्मा लाभेल.” पेत्राने उत्तर दिले: “तुझ्या पैशांचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण परमेश्वराचे दान पैशाने विकत घेता येईल असा तू विचार केला! या सेवेत तुला भाग किंवा सहभाग नाही, कारण तुझे हृदय परमेश्वराच्या दृष्टीने बरोबर नाही. तू तुझ्या या दुष्टतेबद्दल पश्चात्ताप कर आणि प्रभूकडे प्रार्थना कर, या आशेने की, कदाचित ते तुझ्या हृदयातील विचारांबद्दल तुला क्षमा करतील; कारण तू कडूपणाने भरलेला आणि पापाचा दास आहेस असे मला दिसते.” तेव्हा शिमोन म्हणाला, “तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी मजवर येऊ नयेत, यासाठी प्रभूला विनवणी करा.” आणखी प्रभूचे वचन गाजवून व येशूंबद्दल साक्ष देऊन पेत्र व योहान यरुशलेमला परतले. परत जाताना रस्त्याने शोमरोनातील अनेक खेड्यांमध्ये थांबून त्यांनी तेथील लोकांना शुभवार्ता सांगितली. आता प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ दक्षिणेकडील रस्त्यावर जा, तो वाळवंटातून जाणारा रस्ता यरुशलेमपासून गाझाकडे जातो.” तेव्हा तो निघाला आणि जात असताना रस्त्यावर त्याला इथिओपिया देशाचा एक षंढ भेटला, हा षंढ इथिओपियाची राणी कांदकेचा महत्त्वाचा अधिकारी व खजिनदार होता. हा मनुष्य यरुशलेमला आराधना करण्यासाठी आला होता, आणि आता घरी परत जात असताना तो त्याच्या रथामध्ये बसून यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. तेव्हा पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “तू रथ गाठ आणि त्याच्या जवळच चालत राहा.” मग फिलिप्प धावत रथापर्यंत गेला आणि तो खोजा यशायाह संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. ते ऐकून त्याने त्याला विचारले, “आपण जे वाचत आहात ते आपणास समजते काय?” तो म्हणाला, “कोणीतरी स्पष्टीकरण करून सांगितल्याशिवाय हे मला कसे समजेल?” म्हणून त्याने फिलिप्पाला विनंती केली की, त्याने रथात चढून त्याच्याजवळ बसावे. शास्त्रलेखातील जो उतारा तो षंढ वाचीत होता तो असा होता: “वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही. त्याच्या लीन अवस्थेत तो न्यायापासून वंचित राहिला. त्याच्या वंशजांबद्दल कोण बोलू शकेल? कारण त्याचे जीवन पृथ्वीवरून काढून घेण्यात आले होते.” षंढाने फिलिप्पाला विचारले, “संदेष्टा कोणाविषयी बोलत आहे, स्वतःविषयी किंवा दुसर्‍या कोणाविषयी?” तेव्हा फिलिप्पाने त्याच शास्त्रलेखापासून सुरुवात करून त्याला येशूंची शुभवार्ता सांगितली. तसेच पुढे प्रवास करीत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका जलाशयाजवळ ते आले आणि त्याचवेळेस षंढ म्हणाला, “पाहा, येथे पाणी आहे. माझा बाप्तिस्मा होण्यासाठी काही अडचण आहे काय?” फिलिप्पाने उत्तर दिले, “आपण पूर्ण अंतःकरणाने विश्वास धरीत असाल, तर आपला बाप्तिस्मा होऊ शकतो.” आणि षंढाने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा मी विश्वास ठेवतो.” मग त्याने रथ थांबविण्यास सांगितले आणि फिलिप्प व षंढ दोघेही खाली पाण्यात उतरले आणि फिलिप्पाने त्याला बाप्तिस्मा दिला. ते पाण्यातून वर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने एकाएकी फिलिप्पाला उचलून नेले आणि त्या षंढाला तो पुन्हा कधीही दिसला नाही. तो आनंद करीत त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला. फिलिप्प, अजोत या शहरात दिसून आला आणि पुढे प्रवास करीत कैसरीया येथे पोहोचेपर्यंत त्याला वाटेत लागलेल्या सर्व गावांमध्ये त्याने शुभवार्ता सांगितली.

प्रेषित 8:4-40 साठी चलचित्र