YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषित 7:1-16

प्रेषित 7:1-16 MRCV

तेव्हा महायाजकाने स्तेफनाला विचारले, “हे आरोप खरे आहेत काय?” स्तेफनाने त्यावर असे उत्तर दिले: “बंधुजनहो व वडिलांनो, माझे ऐका! आपला पिता अब्राहाम हारानात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटामिया देशात असताना गौरवशाली परमेश्वर त्याला प्रकट झाले. परमेश्वर त्याला म्हणाले, ‘तू आपला देश व आपले लोक सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा.’ “तेव्हा त्याने खाल्डियनांचा देश सोडला आणि तो हारान येथे राहिला. त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर, परमेश्वराने त्याला तुम्ही सध्या राहत आहात त्या भूमीत पाठविले. परमेश्वराने त्याला येथेही वतन दिले नाही, पाऊल पडेल एवढी जमीनदेखील दिली नाही. परंतु त्यावेळी अब्राहामाला मूलबाळ नव्हते, तरी परमेश्वराने त्याला असे अभिवचन दिले की, हा देश त्याला आणि त्याच्या नंतरच्या संततीला वतन म्हणून दिला जाईल. परमेश्वर त्याच्याशी अशा रीतीने बोलले: ‘तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल. परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन,’ असे परमेश्वराने म्हटले, ‘आणि शेवटी त्या देशातून ते बाहेर येतील आणि या ठिकाणी माझी उपासना करतील.’ नंतर परमेश्वराने अब्राहामाला, सुंतेचा करार दिला आणि अब्राहाम इसहाकाचा पिता झाला आणि तो आठ दिवसांचा असतानाच त्याची सुंता झाली. पुढे इसहाक हा याकोबाचा पिता झाला आणि याकोब हा बारा पूर्वजांचा पिता झाला. “कारण पूर्वज योसेफाचा मत्सर करीत होते, म्हणून त्यांनी त्याला इजिप्तमध्ये गुलाम म्हणून विकले. परंतु परमेश्वर त्याच्याबरोबर होते, आणि त्यांनी योसेफाला त्याच्या सर्व संकटातून सोडविले. परमेश्वराने योसेफाला ज्ञान दिले आणि इजिप्तचा राजा फारोहची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. म्हणून फारोहने त्याची इजिप्तवर शासक आणि त्याच्या राजवाड्यातील सर्व कार्यभार पाहण्यासाठी नेमणूक केली. “तेव्हा इजिप्त आणि कनान देशामध्ये दुष्काळ पडला आणि सर्वठिकाणी हाहाकार माजला, तेव्हा आपल्या पूर्वजांना अन्न मिळेना. जेव्हा याकोबाने ऐकले की इजिप्त देशामध्ये धान्य आहे, तेव्हा त्याने आपल्या पूर्वजांना प्रथम भेटीसाठी त्या देशात पाठविले. त्यांच्या दुसर्‍या भेटीच्या वेळी योसेफाने आपण कोण आहोत याची ओळख आपल्या भावांना करून दिली व योसेफाच्या घराण्याविषयी फारोह राजाला सर्वकाही कळले. यानंतर, योसेफाने त्याचा पिता याकोबाला आणि त्याच्या सर्व कुटुंबीयांनी बोलावून घेतले. ते सर्वजण मिळून पंचाहत्तर लोक होते. नंतर याकोब खाली इजिप्तमध्ये आला आणि तिथेच तो आणि आपले पूर्वज मरण पावले. त्यांचे मृतदेह शेखेमात आणण्यात आले व अब्राहामाने हमोराच्या पुत्रांना पैसे देऊन विकत घेतलेल्या कबरेत पुरण्यात आले.

प्रेषित 7:1-16 साठी चलचित्र