प्रेषित 3:1-11
प्रेषित 3:1-11 MRCV
एके दिवशी दुपारी तीन वाजता, प्रार्थनेची वेळ असल्यामुळे पेत्र आणि योहान मंदिरात जात होते. त्यावेळी जन्मापासून लंगडा असलेल्या एका मनुष्याला सुंदर नावे मंदिराच्या दरवाजाजवळ आणले जात होते, जिथे त्याला दररोज मंदिराच्या अंगणात जात असणार्यांकडे भीक मागण्यासाठी ठेवले जात होते. जेव्हा त्याने पेत्र आणि योहानला तिथे प्रवेश करताना पाहिले, त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. तेव्हा पेत्राने व योहानाने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र त्याला म्हणाला, “आमच्याकडे पाहा!” त्यांच्याकडून काही मिळेल या अपेक्षेने त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले. परंतु पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याजवळ चांदी किंवा सोने नाही, परंतु जे आहे ते तुला देतो. नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.” मग त्याने त्या मनुष्याचा उजवा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि त्याच क्षणी त्याच्या पायात व घोट्यात बळ प्राप्त झाले. तो उडी मारून पायावर उभा राहिला व चालू लागला. मग चालत, उड्या मारीत आणि परमेश्वराची स्तुती करीत तो त्यांच्याबरोबर मंदिराच्या अंगणात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना आणि परमेश्वराची स्तुती करताना पाहिले, आणि जो मंदिराच्या सुंदर नावे दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी बसत असे, तो हाच आहे अशी त्यांची ओळख पटली. त्याच्या बाबतीत जे काही घडले होते, त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले. मग तो पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता, सर्व लोक फार आश्चर्यचकित होऊन शलोमोनाच्या देवडीकडे धावत आले.

