त्यावेळी पेत्र अकरा प्रेषितांसह उभा राहून, त्या जमावाला उद्देशून मोठ्याने म्हणाला: “यरुशलेममधील यहूदी बंधुनो आणि रहिवाश्यांनो, तुम्हाला या गोष्टी स्पष्ट समजणे आवश्यक आहे; म्हणून माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका. तुम्ही समजता त्याप्रमाणे ही माणसे द्राक्षारसाने मस्त झालेली नाहीत. आता तर सकाळचे फक्त नऊ वाजले आहेत! तर पाहा याविषयी संदेष्टा योएल याने असे भविष्य केले होते:
“ ‘शेवटच्या दिवसात,
मी माझा आत्मा सर्व मनुष्यमात्रावर ओतेन, असे परमेश्वर म्हणतो.
तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी सांगतील,
तुमचे तरुण लोक दृष्टांत पाहतील,
व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील.
त्या दिवसांमध्ये मी माझ्या दासांवर,
स्त्री आणि पुरुष यावर माझा आत्मा ओतीन.
आणि ते भविष्यवाणी करतील.
मी वर स्वर्गात अद्भुत गोष्टी प्रकट करीन
आणि खाली पृथ्वीवर चिन्हे,
रक्त, अग्नी व धुरांचे मेघ दाखवीन.
प्रभुचा महान व गौरवी दिवस येण्यापूर्वी,
सूर्याचे अंधकारात रूपांतर होईल.
आणि चंद्र रक्तासमान होईल.
आणि जो कोणी प्रभुच्या नावाने
त्यांचा धावा करील तोच वाचेल.’
“अहो इस्राएल लोकहो! आता हे लक्ष देऊन ऐका: तुम्हाला चांगलेच माहीत आहे की, परमेश्वराने नासरेथकर येशूंना अधिकृत मान्यता देऊन त्यांच्याद्वारे तुमच्यामध्ये चमत्कार, अद्भुत गोष्टी व चिन्हे केली. परमेश्वराच्या पूर्वनियोजित योजनेप्रमाणे व त्याच्या पूर्वज्ञानानुसार या मनुष्यास तुमच्या हातात सोपवून दिले आणि तुम्ही दुष्ट लोकांच्या मदतीने, त्यांना क्रूसावर खिळे ठोकून जिवे मारले. परंतु परमेश्वराने त्यांची मृत्यूच्या वेदनांपासून सुटका केली, व त्यांना मरणातून पुन्हा उठविले, कारण मृत्यूला येशूंवर अधिकार चालविणे अशक्य होते. दावीद राजा त्यांच्यासंबंधी म्हणतो:
“ ‘मी माझ्या प्रभुला नित्य दृष्टीसमोर ठेविले आहे.
कारण तो माझ्या उजव्या हाताला आहे,
म्हणून मी डळमळणार नाही.
यामुळे माझे हृदय आनंदित झाले आहे आणि माझी जीभ स्तुतीगायन करीत आहे;
माझ्या शरीराला आशेत विसावा मिळाला आहे,
कारण तू मला अधोलोकात राहू देणार नाहीस,
किंवा तुझ्या पवित्र जनाला सडण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत;
तुझ्या सान्निध्यात मला हर्षाने भरशील.’
“प्रिय यहूदी बंधुनो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की, आपला पूर्वज दावीद मरण पावला आणि त्याला पुरले, व त्याची कबर आज देखील येथे आहे. परंतु तो संदेष्टा होता व त्याला माहीत होते की परमेश्वराने त्याला शपथ वाहून अभिवचन दिले होते की, त्याच्या वंशजांपैकी एक त्याच्या सिंहासनावर बसेल. पुढे होणार्या गोष्टी पाहता, तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल बोलला, की त्यांना अधोलोकात राहू दिले नाही आणि त्यांच्या देहाला सडण्याचा अनुभव येऊ दिला नाही. त्याच येशूंना परमेश्वराने मरणातून उठवून जिवंत केले आणि त्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. आता ते परमेश्वराच्या उजवीकडे उच्च पदावर आहेत, अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांनी तो पवित्र आत्मा पित्याकडून घेऊन आम्हावर ओतला आहे, त्याचाच हा परिणाम जे तुम्ही आता पाहात आणि ऐकत आहात. कारण दावीद आकाशात कधीच चढून गेला नाही, तरी तो म्हणाला,
“ ‘प्रभू माझ्या प्रभुला म्हणाले:
“मी तुझ्या शत्रूंना पायाखाली ठेवीपर्यंत
तू माझ्या उजवीकडे बसून राहा.” ’
“यास्तव इस्राएलातील सर्वजणांनी खात्री करून घ्यावी की ज्या येशूंना तुम्ही क्रूसावर दिले होते, त्यांना परमेश्वराने प्रभू आणि ख्रिस्त असे केले आहे.”
हे त्याचे बोलणे लोकांच्या हृदयाला भेदले आणि ते पेत्राला व इतर प्रेषितांना म्हणाले, “बंधुजनहो, आता आम्ही काय करावे?”
पेत्राने उत्तर दिले, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांच्या क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. हे वचन तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी आणि सर्वांसाठी जे फार दूर आहेत आणि ज्यांना प्रभू जे आमचे परमेश्वर बोलावतील त्यांच्यासाठी आहे.”
आणखी त्याने पुष्कळ शब्दांनी त्यांना इशारा दिला आणि त्यांना विनवणी करून म्हटले, “या भ्रष्ट पिढीपासून तुम्ही स्वतःला वाचवा.” ज्यांनी हा त्यांचा संदेश ग्रहण केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार लोकांची त्यांच्या संख्येत भर पडली.