आता अंत्युखिया येथील मंडळीत संदेष्टे व शिक्षक होते: बर्णबा, शिमोन, ज्याला निगेर देखील म्हणत, कुरेनेचा लूक्य, मनायेन ज्याचे संगोपन मांडलिक हेरोद राजाकडून झाले होते आणि शौल. हे सर्वजण प्रभूची आराधना आणि उपास करीत असताना, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौल यांना ज्या कामासाठी मी पाचारण केले आहे त्यासाठी त्यांना वेगळे करा.” तेव्हा उपास आणि प्रार्थना केल्यावर त्यांनी आपले हात त्यांच्यावर ठेवले व त्यांना निरोप दिला. पवित्र आत्म्याने त्या दोघांना त्यांच्या मार्गावर पाठविले, ते खाली सलुकीयाला गेले आणि तारवात बसून सायप्रस बेटावर उतरले. सलमीस या शहरात आल्यानंतर, ते यहूदी लोकांच्या सभागृहांमध्ये गेले व त्यांनी परमेश्वराचे वचन जाहीर केले. योहान त्यांच्याबरोबर मदतनीस म्हणून गेला होता. त्या संपूर्ण बेटावर प्रवास करीत ते पाफोस येथे जाऊन पोहोचले. तिथे त्यांना यहूदी बार-येशू नावाचा जादूगार व खोटा संदेष्टे भेटला. सेर्गियोस पौलुस नावाच्या राज्यपालाचा तो एक सेवक होता. सेर्गियोस पौलुस हा बुद्धिमान व ज्ञानी मनुष्य होता. या राज्यपालाने बर्णबा व शौलना बोलाविले, कारण परमेश्वराचे वचन ऐकण्याची त्याची इच्छा होती. परंतु अलीम जादूगार (असा त्याच्या नावाचा अर्थ आहे) त्याने त्यांना विरोध केला आणि विश्वास ठेवण्यापासून राज्यपालाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केला. मग पवित्र आत्म्याने भरलेला शौल, ज्याला पौल देखील म्हणत असत, त्याने अलीमाकडे रोखून पाहात म्हटले, “तू सैतानाचा पुत्र आहेस आणि सर्व चांगुलपणाचा वैरी आहेस! तू सर्वप्रकारच्या कपटाने व चातुर्याने भरलेला आहेस. प्रभूच्या चांगल्या मार्गाला भ्रष्ट करण्याचे तू कधीच सोडणार नाहीस काय? तर पाहा, आताच प्रभूचा हात तुझ्याविरुद्ध उठला आहे. तू आंधळा होशील आणि काही वेळ तुला सूर्याचा प्रकाश सुद्धा दिसणार नाही.” तत्काळ धुके व अंधकार यांनी तो ग्रासल्यासारखा झाला आणि आपल्याला हाती धरून न्यावे, म्हणून तो इकडे तिकडे कोणाचा तरी चाचपडत शोध करू लागला. राज्यपालाने जे घडले ते पाहिले, तेव्हा त्याने विश्वास ठेवला आणि प्रभूच्या शिक्षणाविषयी तो आश्चर्यचकित झाला. आता पौल आणि त्याचे सहकारी यांनी पाफोस शहर सोडले व ते तारवात बसून पंफुल्यातील पेर्गा येथे आले, या ठिकाणी योहानाने त्यांचा निरोप घेतला व तो यरुशलेमला परतला. ते पेर्गापासून पुढे पिसिदिया प्रांतातील अंत्युखियास गेले. शब्बाथ दिवशी ते सभागृहात गेले आणि तिथे खाली जाऊन बसले. नेहमीप्रमाणे नियमशास्त्र व संदेष्ट्यांच्या ग्रंथातून वाचल्यानंतर, सभागृहातील पुढार्यांनी त्यांना म्हटले: “बंधूंनो, आपल्याजवळ लोकांसाठी काही उत्तेजनपर वचन असेल तर कृपा करून आम्हास सांगा.” पौल उठून उभा राहिला व त्याने हाताने खुणावले आणि म्हणाला: “अहो इस्राएली लोकहो आणि परमेश्वराची उपासना करणारे गैरयहूदी, माझे ऐका! या इस्राएली राष्ट्राच्या परमेश्वराने आपल्या पूर्वजांना निवडून घेतले आणि इजिप्तमध्ये राहत असताना त्यांना फलद्रूप केले. परमेश्वराने आपल्या महान बलाने त्यांना त्या देशातून व गुलामगिरीतून बाहेर आणले; रानात अंदाजे चाळीस वर्षे त्यांनी त्यांचे गैरवर्तन सहन केले; त्यांनी कनानातील सात राष्ट्रांना उलथवून टाकले व त्यांची भूमी वतन म्हणून त्यांच्या लोकांना दिली. हे सर्व घडून येण्यास सुमारे चारशे पन्नास वर्षे लागली. “त्यानंतर, परमेश्वराने त्यांना शमुवेल संदेष्टा येईपर्यंत न्यायाधीश नेमून दिले. यानंतर लोकांनी राजा मागितला आणि परमेश्वराने त्यांना बन्यामीन वंशातील कीशाचा पुत्र शौलाला राजा म्हणून दिले, त्याने चाळीस वर्षे राज्य केले. शौलाला दूर केल्यानंतर, दावीदाला त्यांचा राजा म्हणून नेमले. या दावीदाबद्दल परमेश्वराने साक्ष दिली: ‘माझ्या मनासारखा मनुष्य इशायाचा पुत्र दावीद मला मिळाला आहे; माझ्या इच्छेप्रमाणे असणार्या प्रत्येक गोष्टी तो करेल.’ “परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे, याच मनुष्याच्या वंशामधून येशूंना इस्राएली लोकांसाठी त्यांचा तारणारा म्हणून आणले आहे.
प्रेषित 13 वाचा
ऐका प्रेषित 13
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषित 13:1-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ